उत्तरपत्रिका गहाळ प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात!
By admin | Published: September 22, 2015 01:15 AM2015-09-22T01:15:31+5:302015-09-22T01:15:31+5:30
डॉ.पंदेकृविच्या शिक्षण विभागात घोळ; डॉ.नागदेवे समितीचा अहवाल लवकरच.
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या असून, याप्रकरणी कृषी विद्यापीठाने कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित केली आहे. या समितीने चौकशी पूर्ण केल्याचे वृत्त असून, लवकरच चौकशी अहवाल प्रशासनाला सादर केला जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या द्वितीय वर्षाच्या सूक्ष्म जीवशास्त्र व इतर विषयांच्या शंभर उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत; परंतु निकाल जोपर्यंत लागणार नाही, तोपर्यंत या उत्तरपत्रिका नेमक्या कोणत्या केंद्रावरील होत्या, हे समजणे कृषी विद्यापीठाला कठीण झाले आहे. त्यामुळे आता निकालाची प्र तीक्षा करण्यात येत असली, तरी या गंभीर प्रकरणाकडे कृषी विद्यापीठाने सुरुवातीला दुर्लक्ष केले. गतवर्षी १00 उत्तरपत्रिका गहाळ झाल्या होत्या. त्यामुळे नेमक्या याच विद्यापीठात उत्तर पत्रिका गहाळ कशा होतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणाची ओरड झाल्यानंतर कृषी विद्यापीठाने कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा मुख्य शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली ३१ ऑगस्ट रोजी चौकशी समितीचे गठण केले होते. या समितीने पंधरा दिवसा पासून चौकशी सुरू केली असून,अहवाल कृषी विद्यापीठ प्रशासनाला सादर करणार आहे. यासंदर्भात कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रकाश कडु यांनी उत्तरपत्रिका गहाळ झाल्याप्रकरणीचा चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट करून चौकशी अहवाल पोहोचल्यानंतरच काय तो निष्कर्ष काढता येणार असल्याचे म्हटले आहे.
*कृषी विद्यापीठाच्या शिक्षण विभागात घोळ
कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असून, कृ षी पदवी घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी विविध प्रशासकीय पदे भूषवित आहेत. स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी या कृषी विद्या पीठात सुसज्ज स्पर्धा परीक्षा फोरम आहे; परंतु सातत्याने विद्या पीठाच्या परीक्षा विभागात उत्तरपत्रिका गहाळ होणे व इतर घोळ होत असल्याने त्याचा परिणाम विद्यापीठाच्या प्रतिमेवर होत आहे.