‘महावितरण’ देशातील दुसरी उत्कृष्ट वीज वितरण कंपनी
By admin | Published: November 22, 2014 11:33 PM2014-11-22T23:33:44+5:302014-11-22T23:33:44+5:30
आयसीसीच्या अहवालात गौरवपूर्ण उल्लेख.
अकोला: मागणीप्रमाणे वीज पुरवठा व फिडरनिहाय भारनियमनाच्या नवीन प्रयोगासह, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण)ने राबविलेल्या विविध प्रभावशाली उपाययोजनांची दखल, इंडियन चेंबर ऑफ कॉर्मस (आयसीसी)ने घेतली असून, आयसीसीच्या ताज्या अहवालात, महावितरण ही देशातील द्वितीय क्रमांकाची उत्कृष्ट वीज वितरण कंपनी असल्याचा, गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. गुजरातमधील वीज वितरण कंपनीला प्रथम क्रमांक देण्यात आला आहे.
आयसीसीच्या वतीने देशातील विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या कार्यशैलीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासावर आधारित अहवालात, ज्या कंपन्यांनी विद्युत सेवा क्षेत्रात प्रभावी उपक्रम राबवून ग्राहकांना उत्तम सेवा दिलीे, अशा पाच कंपन्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे. अहवालात अनुक्रमे गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश आणि उत्तरांचल या राज्यांमधील वीज वितरण कंपन्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याचे नमुद केले आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (एमएसईबी)चे २00५ मध्ये महानिर्मिती, महापारेषण व महावितरण अशा तीन कंपन्यांमध्ये विभाजन झाले. विजेच्या क्षेत्रात, १९४७ ते २00५ या कालखंडात राज्यात जेवढा विकास झाला, त्यापेक्षा जास्त विकास गत नऊ वर्षात झाल्याचा दावा महावितरणने केला आहे. महावितरणने गावठाण फिडर सेपरेशन योजना, सिंगल फेजिंग याद्वारे भारनियमनाचे प्रभावी व्यवस्थापन केले आहे. गत पाच वर्षात महाराष्ट्रात १0 लाखांपेक्षा अधिक कृषिपंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
*ह्यवसुलीनुसार भारनियमनह्ण फॉर्म्युल्याचा फायदा
ज्या भागात वीजगळती जास्त, त्या भागात भारनियमन असा नवीन फॉम्र्युला महावितरणे राबविला. त्याचीच दखल आयसीसीने घेतली आहे. ज्या भागात विद्युत गळती जास्त, त्या भागात भारनियमन, तर ज्या भागात वसुली चांगली व नियमित, त्या भागातील ग्राहकांना भारनियमनापासून मुक्ती, हा उपक्रम देशभरात नावाजल्या जात आहे.