एमसीएक्स-एनसीडीएक्सवर डब्बा ट्रेडिंगचा सट्टाबाजार
By admin | Published: March 28, 2017 01:44 AM2017-03-28T01:44:05+5:302017-03-28T01:44:05+5:30
तेल, ढेप, धान्य आणि किराणावर होत असलेल्या या सट्टाबाजाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष
संजय खांडेकर
अकोला, दि. २७- मल्टी कॉमोडिटी एक्स्चेंज आणि नॅशनल कॉमोडिटी डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंजच्या बाजारपेठेच्या दैनंदिन चढ-उतारावर अकोल्यात डब्बा ट्रेडिंगचा सट्टाबाजार जोरात खेळला जात आहे. तेल, ढेप, धान्य आणि किराणावर होत असलेल्या या सट्टाबाजाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. विशेष म्हणजे नागपूरमध्ये अशा प्रकारे डब्बा ट्रेडिंग करणार्यांवर पोलिसांनी कारवाई करून कोट्यवधीचा सट्टाबाजार उजेडात आणला. त्यामुळे नागपूरच्या धर्तीवर अकोल्यात कारवाई झाली तर मोठे जाळे उजेडात येण्याची शक्यता आहे.
सुरुवातीपासून अकोल्यात डब्बा ट्रेडिंगच्या सट्टाबाजारात मोठी उलाढाल होती ; मात्र मध्यंतरी पोलिसांनी अकोट आणि अकोल्यातील सटोडियांवर कठोर कारवाई केल्याने जिल्हाभरातील क्रिकेट सटोडियांचे धाबे दणाणले. त्यामुळे अनेक किक्रेट सटोडियांनी आपले सट्टाबाजाराचे बिर्हाड क्रिकेटवरून एमसीएक्स-एनसीडीएक्स हलविले. गत काही महिन्यांपासून हा डब्बा ट्रेडिंगचा बाजार तेजीत आहे. एमसीएक्स-एनसीडीएक्सवर होत असलेले चढ-उताराचे दर यावर अकोल्यातील २0 ब्रोकर उतारे घेतात. यासाठी एमसीएक्स-एनसीडीएक्ससारखे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. सट्टाबाजारासारखी खायवाडी दररोज डब्बा ट्रेडिंगमध्ये चालते. यातील बहुतांश व्यवहार हा सिक्युरिटी ट्रान्जेक्शन टॅक्सशिवाय होतो. सोबतच इन्कम टॅक्सही बुडविला जातो. डब्बा ट्रेडिंगचे किंगफीन अकोल्यातीलच असल्याने त्याचा बोभाटा होत नाही. कमी मार्जीनवर कॉमोडिटीत व्यवसाय करणारे बहुतांश व्यापारी डब्बा ट्रेडिंगमध्ये गुंतलेले असण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी क्रिकेट सटोडियांसारखा अंकुश जर या डब्बा ट्रेडिंग करणार्या व्यापार्यांवर लावला तर अकोल्यातील मोठा सट्टाबाजार बंद तर होईलच, यासोबत करबुडवेदेखील समोर येतील.