हडपलेला भूखंड ताब्यात घेण्यासाठी सरसावली महापालिका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 02:40 PM2018-03-27T14:40:48+5:302018-03-27T14:40:48+5:30
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फुटाचा तसेच एक कोटी रुपये किमतीचा शासकीय भूखंड हडपल्याचा पर्दाफाश लोकमतने केल्यानंतर मनपा आयुक्त व भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्या आदेशाने भूखंडाची नोंद आता महापालिकेच्या नावाने करण्यात आली आहे.
- सचिन राऊत
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा तब्बल चार हजार स्क्वेअर फुटाचा तसेच एक कोटी रुपये किमतीचा शासकीय भूखंड हडपल्याचा पर्दाफाश लोकमतने केल्यानंतर मनपा आयुक्त व भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्या आदेशाने भूखंडाची नोंद आता महापालिकेच्या नावाने करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सदर भूखंडावरील शाळेचे अतिक्रमण काढून त्यावर तारेचे कुंपण घेऊन भूखंड प्रत्यक्ष मनपाच्या ताब्यात घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक-४ असा चार हजार स्क्वेअर फूट भूखंड तत्कालीन नगरपालिकेचा व आताच्या महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. या भूखंडाचा मूळ हक्क व आखीव पत्रिका म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड महानगरपालिकेच्या मालकीचे असतानाही सदर चार हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून नगरविकास विभागाच्या परवानगीने शेख नावेद शेख इब्राहीम यांना विक्री केला होता. महापालिकेच्या मालकीचा भूखंड विक्री झाल्याचे लोकमतने निदर्शनास मनपा आयुक्त व भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक यांच्या आदेशावरून भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांनी शेख नावेद शेख इब्राहीम यांच्या नावे असलेल्या भूखंडाच्या फेरफार नोंदीचे पुनर्विलोकन केले. त्यानंतर सदर भूखंडाच्या फेरफार नोंदीमध्ये असलेले शेख नावेद शेख इब्राहीम यांच्या नावाची नोंद रद्द करून हा भूखंड महापालिकेच्या नावाने नोंदणी करण्यात आला आहे. लोकमतच्या वृत्तानंतर महापालिकेचे तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान वाचले असून, भूमी अभिलेख विभागाच्या नोंदीनंतर मनपाने तातडीने पावले उचलून सदर भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरूकेली आहे. सदर शाळेचे अतिक्रमण लवकरच काढण्याचे निर्देश मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिले आहेत.