शिधापत्रिकाधारकांना आता ओळख पटवून धान्य वाटप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:04 AM2018-02-16T02:04:18+5:302018-02-16T02:06:31+5:30
अकोला : आधार संलग्नित सार्वजनिक वितरण व्यवस्था (एईपीडीएस) प्रणालीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याची प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्हय़ात सुरू करण्यात येणार आहे; मात्र ज्या शिधापत्रिकाधारकांकडे ‘आधारकार्ड’ नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना ओळख पटवून धान्य वितरित करण्यात येणार आहे.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आधार संलग्नित सार्वजनिक वितरण व्यवस्था (एईपीडीएस) प्रणालीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्याची प्रक्रिया राज्यातील सर्व जिल्हय़ात सुरू करण्यात येणार आहे; मात्र ज्या शिधापत्रिकाधारकांकडे ‘आधारकार्ड’ नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना ओळख पटवून धान्य वितरित करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील रास्त भाव दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्या असून, त्याद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने ओळख पटवून पात्र शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यामध्ये सध्या राज्यातील नागपूर, सोलापूर, वाशिम, जालना, नांदेड, कोल्हापूर, हिंगोली, वर्धा व भंडारा या जिल्हय़ातील रास्त भाव दुकानांत आधार संलग्नित सार्वजनिक वितरण व्यवस्था (एईपीडीएस) या अद्ययावत प्रणालीचा वापर करून धान्य वितरित करण्यात येत आहे. या पृष्ठभूमीवर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या गत २ फेब्रुवारी रोजीच्या पत्रानुसार राज्यातील सर्व जिल्हय़ात १ मार्चपासून ‘एईपीडीएस’ प्रणालीचा वापर करून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्नित करण्यात आलेल्या शिधपत्रिकाधारकांना ‘ई-पॉस’ मशीनद्वारे धान्य वितरित करण्यात येणार आहे. तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक संलग्नित करण्यात आले नाही, अशा शिधापत्रिकाधारकांचे आधार क्रमांक संलग्नित (लिंक) करण्यात येणार आहेत; मात्र ज्या शिधापत्रिकाधारकांकडे आधारकार्ड किंवा आधार क्रमांक नाही, अशा शिधापत्रिकाधारकांना त्यांची ओळख पटवून धान्य वाटप करण्यात येणार आहे.
आधार क्रमांक ‘लिंक’ असलेल्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठय़ांमार्फत आधारकार्ड नसलेल्या शिधापत्रिकाधारकांची ओळख पटविण्यात येणार असून,ओळख पटवून संबंधित शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यात येणार आहे.
‘डीएसओं’नी मागितली सरपंच, तलाठय़ांची माहिती!
आधारकार्ड नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना ओळख पटवून रास्त भाव दुकानांमधून धान्य वितरित करण्यात येणार आहे. गाव पातळीवर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामसेवकांमार्फत संबंधित शिधापत्रिकाधारकांची ओळख पटविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्हय़ातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी त्यांचे आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक इत्यादी माहिती जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडून (डीएसओ) मागविण्यात आली आहे. अशीच माहिती इतर जिल्हय़ातही ‘डीएसओं’कडून मागविण्यात आली आहे.
‘एईपीडीएस’ प्रणालीचा वापर करून १ मार्चपासून शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये ज्या शिधापत्रिकांकडे आधार क्रमांक नाही, अशा शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवून धान्य वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हय़ातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांचे आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक इत्यादी माहिती मागविण्यात आली आहे.
- संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी