शिर्ला येथील उच्चविद्याविभूषित युवकाने उत्पादित केली सेंद्रिय हळद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:44 AM2017-12-25T01:44:14+5:302017-12-25T01:45:27+5:30
शिर्ला: शिर्ला येथील स्वप्निल सुहास कोकाटे यांनी गुजरातमध्ये असलेल्या लाख रुपयांच्या नोकरीवर लाथ मारून झीरो बजेट सेंद्रिय हळदीची शेती करीत लाखो रुपये कमाईचा मार्ग चोखाळला.
संतोषकुमार गवई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्ला: शिर्ला येथील स्वप्निल सुहास कोकाटे यांनी गुजरातमध्ये असलेल्या लाख रुपयांच्या नोकरीवर लाथ मारून झीरो बजेट सेंद्रिय हळदीची शेती करीत लाखो रुपये कमाईचा मार्ग चोखाळला.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या एमएससी कृषी पदवीप्राप्त स्वप्निल सुहासराव कोकाटे यांनी गुजरात येथील लाख रुपयांची नोकरी सोडून झीरो बजेट सेंद्रीय हळदीची शेती करीत एकरी ३ लाख २0 हजार रुपये शुद्ध नफा मिळविला आहे. त्यांनी सात एकर लागवडीतून सुमारे २२ लाख ४५ हजार रुपये शुद्ध नफा प्राप्त केला आहे.
मागील दोन वर्षांपासून त्यांच्या प्रयोगाला सातत्याने यश मिळाले आहे. स्वप्निल कोकाटे यांनी सांगितले की, शेतीत सर्वाधिक ५0 टक्के खर्च बी-बियाण्यांवर होतो. त्यानंतर कीटकनाशके, रासायनिक खते यावर खर्च होतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून शेतकरी मोठय़ा प्रमाणात अडचणीत येतो. त्यानंतर पारंपरिक पिकांना बाजारपेठेत भाव नाही, त्यामुळे आम्ही सेंद्रिय हळद व रेशीम शेतीकडे वळलो. परिणामी उत्पादन खर्च घटला, नफा वाढला.
हळदीला एकरी २५-३0 हजार खर्च येतो; मात्र उत्पन्न ३ लाख २0 हजार रुपयांपेक्षा जास्त मिळते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म आहेत, ती जनावरांपासून सुरक्षित आहे. कंदवर्गीय पीक असून, ती रोगकिडीस प्रतिकारात्मक आहे. तसेच त्यामुळे शेतीची सुपिकता वाढवण्यात मदत होते. विशेष बाब म्हणजे या पिकाचे बेणे विकत घ्यावे लागत नाही. झेडबीएनएफ यंत्रणांवर आधारित मालाला देश-विदेशात चांगली मागणी आहे. या पिकावर कीटकनाशकांच्या पारंपरिक फवारण्या करण्याऐवजी त्यांनी जीवामृत, ताक, दशपर्णीचा वापर केला. शेतकर्यांनी खर्चिक पारंपरिक शेती करून आत्महत्येचा मार्ग चोखाळण्याऐवजी झीरो बजेट सेंद्रिय शेती करावी, असा संदेश स्वप्निल कोकाटे यांनी दिला.