पंचायत राज समितीचा दौरा एप्रिलमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2017 02:46 AM2017-01-20T02:46:28+5:302017-01-20T02:46:28+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच ठरणार दौरा
अकोला, दि. १९- विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने जिल्हा परिषदेचा कारभार तपासणीसाठी ठरलेला दौरा आता एप्रिलमध्येच होणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक आणि त्यानंतर लगेच सुरू होणारे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आटोपल्यानंतरच दौरा निश्चित होणार आहे. सद्यस्थितीत पुढील आदेशापर्यंत दौरा पुढे ढकलण्यात येत आहे, असे पत्र विधिमंडळाचे उपसचिव विलास आठवले यांनी बुधवारीच जिल्हा परिषदेला पाठविले आहे.
विधिमंडळाच्या पंचायत राज समितीचा दौरा १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान राहील, त्यासाठी तयारी करण्याचे पत्र आधीच विधिमंडळाकडून जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले. समितीचा दौरा निश्चित होण्यापूर्वी राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला नव्हता. ११ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने दोन टप्प्यातील निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.
त्यामध्ये अकोला महापालिकेत २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. हा कार्यक्रम पाहता जिल्हय़ातील सर्वच प्रशासकीय यंत्रणेवर निवडणुकीची कमी-अधिक प्रमाणात जबाबदारी राहणार आहे.
त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी गुंतल्यास त्यांना पंचायत राज समितीपुढे उपस्थित राहण्यास कसरत करावी लागेल. त्यामुळे समितीचा दौरा पुढे ढकलण्याची शक्यताच अधिक असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध केले होते. त्यासाठी निवडणूक आयोगाने १७ जानेवारी रोजी विधिमंडळाच्या विविध समित्यांना अधिकृतपणे पत्र देत दौरा कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सूचना दिल्या होत्या. आयोगाच्या पत्रानंतर समितीच्या दौर्याबाबतची बैठक बुधवारी विधिमंडळात पार पडली. आयोगाने निवडणुकीच्या धामधुमीत समितीच्या दौर्यातील संभाव्य कामकाजादरम्यान होणार्या बाबी विचारात घेतल्या. त्यानुसार आयोगाच्या पत्रानुसार निवडणूक होईपर्यंत दौरा लांबणीवर पडला, तर विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन त्यानंतर लगेच सुरू होणार आहे. ते संपेपर्यंत समितीचा दौरा ठरणार नाही. त्यामुळे आता समितीचा दौरा थेट एप्रिलमध्येच होण्याची शक्यता आहे.