प्रॉपर्टी ब्रोकर किसनराव हुंडीवाले यांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 04:55 PM2019-05-06T16:55:58+5:302019-05-07T15:37:01+5:30
किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोेंदणी कार्यालयात अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली.
अकोला : महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक खडकी येथील रहिवासी किसनराव हुंडीवाले यांची सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सार्वजनिक न्यास नोेंदणी कार्यालयात (न्यायालयात)अग्निरोधक यंत्राचे सिलिंडर डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्रीराम गावंडे त्यांचा मुलगा विक्रम गावंडे याच्यासह नऊ जणांनी हे हत्याकांड घडविले. यामध्ये हुंडीवाले यांचे वकील अॅड. नितीन धुत यांनाही मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ कौलखेड या शैक्षणिक संस्थेंतर्गत स्वामी विवेकानंद इंग्लिश हायस्कूल कौलखेड आणि स्वामी विवेकानंद प्राथमिक मराठी शाळा तुकाराम चौक येथे कार्यान्वित आहे. या संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवारी दुपारी १२ वाजता किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना दुसºया गटातील विक्रम ऊर्फ छोटु श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सुरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे रा. खेतान नगर कौलखेड आणि सतीश तायडे, विशाल तायडे व साबीर रा. बार्शीटाकळी हे नऊ जण न्यास नोंदणी कार्यालयात आले आणि त्यांनी किसनराव हुंडीवाले यांच्यावर हल्ला चढविला. टेबल, खुर्ची आणि लाकडी काठ्यांनी त्यांना मारहाण करीत असतानाच विक्रम ऊर्फ छोटु गावंडे याने अग्निरोधक सिलिंडर काढून तीन वेळा त्यांच्या डोक्यावर हल्ला केल्याने हुंडीवाले रक्ताच्या थारोळ्यात पडले. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
शैक्षणिक संस्थेतील वाद तसेच गावंडे यांची नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केल्याने किसनराव हुंडीवाले यांची हत्या करण्यात आल्याची तक्रार त्यांचा मुलगा प्रवीण हुंडीवाले यांनी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी विक्रम ऊर्फ छोटु श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सुरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे रा. खेतान नगर कौलखेड आणि सतीश तायडे, विशाल तायडे व साबीर या नऊ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, १४३,१४७,१४८,१४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.