‘राणी महल’ पोलीस लॉन्स अकोलेकरांसाठी वैभव
By admin | Published: March 26, 2017 07:42 PM2017-03-26T19:42:08+5:302017-03-26T19:42:08+5:30
पोलीस कल्याण निधीतून अकोल्यात उभारण्यात आलेले राणी महल पोलीस लॉन्स अकोलेकरांसाठी वैभव असल्याचे प्रतिपादन गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे केले.
पालकमंत्री पाटील यांचे प्रतिपादन
अकोला : पोलीस कल्याण निधीतून अकोल्यात उभारण्यात आलेले राणी महल पोलीस लॉन्स अकोलेकरांसाठी वैभव असल्याचे प्रतिपादन अकोल्याचे पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या प्रयत्नानेच हे भव्य लॉन्स आज निर्माण झाल्याचा गौरोदगार गृह राज्यमंत्री पाटील यांनी काढले.
पंचायत समिती रोडवर उभारण्यात आलेल्या राणी महल पोलीस लॉन्सच्या उद्घाटन कार्यक्रमात पाटील बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री डॉ. रणजित पाटील होते. प्रमुख उपस्थितीत आ. हरीश पिंपळे, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, माजी महापौर सुमनताई गावंडे, उज्ज्वला देशमुख, नगरसेवक हरीश अलीमचंदाणी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पाटील यांनी सांगितले, की पोलीस खात्याची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राणी महलच्या माध्यमातून भव्य वास्तू उभारण्यात आली आहे. यासाठी चंद्रकिशोर मीणा यांचे मोठे योगदान आहे. टीम वर्कमधून काम केल्याने हे शक्य झाले. पोलीस लॉन्सला अंतिम स्वरूप देण्यासाठी सज्जनशक्ती एकत्र आल्याने हे काम पूर्णत्वास गेले आहे. पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. अकोलेकरांसाठी लोकाभिमुख काम करण्यात आले असल्याने आनंद वाटत आहे. सामाजिक प्रपंच या राणी महल पोलीस लॉन्समधून भागणार आहे. प्रांगण अंगण यामधून नंदनवन साकारण्यात आले असून, हे कार्य केवळ पोलीस अधीक्षक मीना यांच्यामुळे झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. योग्य नियोजन केल्याने पोलिसांना त्यांच्या हक्काचे आणि अत्यंत माफक दरात वैभव असणारे पोलीस लॉन्स मिळणार असल्याचेही पाटील बोलताना म्हणाले.
राज्यातील सर्वात मोठे लॉन्स - मीणा
अकोला येथे साकारण्यात आलेले राणी महल पोलीस लॉन्स हे राज्यातील सर्वात मोठे पोलीस लॉन्स असल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी दिली. पोलीस कल्याण निधीतून हे लॉन्स साकारण्यात आले असून, २0१४ पासून सुरू असलेल्या या प्रयत्नांना तीन वर्षांनंतर अंतिम स्वरूप देण्यात आले. यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी मोठे परिश्रम घेतले असून, पोलिसांच्या कुटुंबीयांना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी हे लॉन्स म्हणजे त्यांच्या हक्काचे लॉन्स राहणार आहे.