आलेगावात पाण्याची भीषण टंचाई; ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा घागर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 09:45 PM2018-02-17T21:45:03+5:302018-02-17T21:55:42+5:30
आलेगाव (अकोला): येथे गेल्या एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वॉर्ड क्र. चारमधील मुस्लीम महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयवर १७ फेब्रुवारी घागर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलेगाव (अकोला): येथे गेल्या एक महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी वॉर्ड क्र. चारमधील मुस्लीम महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयवर १७ फेब्रुवारी घागर मोर्चा काढला.
ग्रामपंचायत सरपंचपती गजेंद्र तेलगोटे यांना निवेदन देऊन सात दिवसांत पाण्याची समस्या सोडवावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. आंदोलनामध्ये अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची राहील, असे निवेदनामध्ये नमूद केले आहे. तसेच चोंढी, निर्गुणा प्रकल्पाचे पाणी शासन व प्रशासनाने पारस येथील औष्णिक केंद्राला दिल्यामुळे गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली व ग्रामस्थांसह पाळीव जनावराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशा विविध समस्या परिसरात निर्माण झाल्याचे महिलांनी सांगितले, तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने मस्तानशाह चौकामध्ये ५0 फुटावर दोन हातपंप उभारले; परंतु ज्या ठिकाणी पाण्याच्या गंभीर समस्या आहेत, तेथे एकही हातपंप नाही. त्यामुळे पाण्याच्या समस्येसाठी नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या समस्येची संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन पाणी समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.