खांबोरा पाणीपुरवठा योजनेला सुकळी नंदापूरचा आधार
By admin | Published: March 18, 2015 01:34 AM2015-03-18T01:34:01+5:302015-03-18T01:34:01+5:30
पाणीटंचाई निवाणार्थ ९४ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी.
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात उपायोजना करण्यास शासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यानुसार खांबोरा ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेला सुकळी नंदापूर तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी सोमवारी शासनाने ९४ लाख ६६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून जिल्ह्यातील ६४ गावांना पाणी पुरविले जाते. खारपाणपट्टय़ातील बहुतांश गावे या योजनेत येतात. या गावांमधील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, या योजनेसाठी काटेपूर्णा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. त्यासाठी ४ नोव्हेंबर २0१४ रोजी जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकार्यांची खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यानुसार प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात काटेपूर्णातून पाणीपुरवठय़ासाठी लागणारा कालावधी अधिक असल्याने या प्रस्तावाचा उन्हाळ्य़ातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कोणताही फायदा होणार नव्हता, याची जाणीव आ. सावरकर यांनी प्रशासनाला करून दिली. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या योजनेला सुकळी नंदापूर साठवण तलावातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला होता. २0 फेब्रुवारी २0१५ रोजी झालेल्या सचिवस्तरीय बैठकीत या योजनेला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून मंगळवार, १0 मार्च रोजी ९४.६६ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविण्यात आला. त्याला शासनाने मंजुरी दिली आहे.