पातूर तालुक्यातील सायवणी, मळसूर, चान्नी शिवारात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 02:25 AM2017-12-22T02:25:49+5:302017-12-22T02:26:07+5:30
चान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत.
सायवाणी शेतकरी सुपाती अमृता गटुले हे १९ डिसेंबरच्या सायंकाळी ६.३0 वाजता शेतातून घरी येत असताना पुंडलीक जानकीराम काळे यांच्या शेताजवळ त्यांना बिबट्या दिसला. गटुले यांनी आरडाओरड केल्याने व तेवढय़ात त्या रस्त्याने मोटारसायकल आल्याने बिबट्या पळून गेला. यापूर्वीसुद्धा १३ डिसेंबरला सुपाजी गटुले यांच्यावर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला करून त्यांना जबर जखमी केले होते. चान्नी येथेसुद्धा रामकृष्ण श्यामराव येनकर या शेतकर्याला तीन दिवसांपूर्वी सुकळी शिवारातील त्यांच्या शेतात बिबट्या दिसला होता. यापूर्वीसुद्धा चतारी शिवारातसुद्धा नीलगायींना बिबट्याने ठार मारले, तरी वन विभागाने कार्यवाही करून शेतमजुरांना अभय द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी, शेतमजुरांनी केली आहे.
बिबटच्या वास्तव्याने शिर्लाचे ग्रामस्थ भयभीत
शिर्ला येथील अमोल विठोबा गवई यांच्या शेतात बिबटने डरकाळ्या फोडल्याने गावातील वातावरण भयभीत झाले असून, दहशतीने आबालवृद्ध घरात तर तरुण गावाबाहेर मिळेल ते हत्यार घेऊन बिबट्याच्या शोधात घराबाहेर पडले होते. बिबट्याने शिर्ला गावालगत येण्याची पहिली वेळ आहे. कारणही तसेच आहे, गावाच्या चहूबाजूंनी जलयुक्त शिवारचे पाणवठे आहेत. त्याबरोबरच शिकारीसाठी पशुधन आहे. सायंकाळी आठच्या सुमारास आलेल्या बिबट्याच्या बातमीने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गुरुवारी पुन्हा आढळला बिबट!
सायवणी येथील सुरेश पाटील यांच्या केळीच्या शेतात मोतीराम ताले यांना बिबट दिसला. त्यांनी सरपंच स्नेहल ताले यांना माहिती दिली. सरपंच ताले यांनी ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नालिंदे यांना दिली. परिसरात वन विभागाचे कर्मचारी एच.आर. राठोड, ताकझुरे, जाधव, दामोदर, कळंद आदींनी भेट देऊन पाहणी केली.
सध्या तूर, कपाशी, गहू , हरभरा यांचा हंगाम असल्याने शेतकर्यांना शेतात जाणे गरजेचे आहे. बिबट्याच्या भीतीने परिसरातील शेतकर्यांनी शेतात जाणे बंद केले आहे. याचा परिणाम उत्पादनावर होणार असल्याने वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. तसेच रात्रीचे भारनियमन बंद करण्याचे गरज आहे.
-स्नेहल धनंजय ताले,
सरपंच, सायवणी