स्वाइन फ्लू ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:47 AM2017-08-01T02:47:37+5:302017-08-01T02:50:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पावसाळ्यात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले असतानाच आता स्वाइन फ्लू या अत्यंत संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. विषाणूंपासून होणाºया घातक आजाराचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून, सदर रुग्णावर सर्वोपचार रुग्णालयातील विशेष कक्षात उपचार सुरू आहेत. गत पंधरवड्यात स्वाइन फ्लूचे दोन संशयित रुग्ण आढळून आल्यानंतर आता हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे शहरावर स्वाइन फ्लूचे सावट कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
पावसाळ्यात सर्वत्र पावसाचे पाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अशातच स्वाइन फ्लू या आजाराचे वाहक असलेल्या वराहांची संख्याही मोठी आहे. उन्हाळ्यात अकोल्यात स्वाइन फ्लूचा उद्रेक होऊन त्यावेळी या आजाराने तिघांचा बळी घेतला होता. आता पुन्हा या घातक आजाराने डोके वर काढले आहे. गत चार दिवसांपूर्वी उमरी येथील एका १६ वर्षीय मुलीला स्वाइन फ्लू सदृश लक्षणे आढळून आल्यानंतर एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे सदर मुलीचा स्वॉब घेऊन तपासणी करण्यात आली असता, अहवाल स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या मुलीस रविवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे स्वॉब घेण्यात येऊन तो तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला. दरम्यान, या मुलीवर टॅमी फ्लू उपचार सुरू करण्यात आला असून, सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.