कृषी पंपधारकांना थकबाकीमुक्त होण्याची आज शेवटची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:37 AM2017-11-15T01:37:44+5:302017-11-15T01:41:51+5:30
कृषी पंपांची थकबाकी असणार्या शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरणार्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला नाही, त्यांनी विनाविलंब नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कृषी पंपांची थकबाकी असणार्या शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरणार्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर आहे. या योजनेत सहभागी होऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी ही शेवटची संधी असून, ज्या शेतकर्यांनी अद्याप योजनेत सहभाग घेतला नाही, त्यांनी विनाविलंब नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणार्या लाभार्थी शेतकर्यांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून नवीन स्वरूपाची वीज देयके देण्यात येत असून, त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हप्त्यात भरावयाची, याची माहिती देण्यात आलेली आहे. योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकर्यांच्या देयकात महावितरणच्या बोधचिन्हाशेजारी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२0१७ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या देयकात खालील बाजूस ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. देयकाच्या डाव्या बाजूस १५ नोव्हेंबर २0१७ पूर्वी शेतकर्यांनी किती रक्कम भरायची आहे, याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर २0१७ ते डिसेंबर २0१८ पर्यंत पाच हप्त्यांत किती रक्कम भरावी लागणार आहे, याची माहिती देण्यात आलेली आहे. हे देयक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२0१७ अंतर्गत सहभागी होण्यासाठी तसेच थकीत रकमेचे सुलभ हप्ते माहीत होण्यासाठी देण्यात येणार आहेत. त्यात महावितरणकडून ३0 हजार रुपयांच्या आत थकबाकी असणार्या ग्राहकांना पाच सुलभ हप्ते तर ३0 हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असणार्या शेतकर्यांना १0 सुलभ हप्ते मिळणार आहेत. जे शेतकरी अद्याप या योजनेत सहभागी झाले नाहीत, त्यांनी घाई करून योजनेत विनाविलंब सहभाग नोंदवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
५४ हजार शेतकर्यांकडे २५0 कोटींची थकबाकी
जिल्हय़ातील तब्बल ५४ हजार १३२ शेतकर्यांकडे महावितरणची देयकापोटीची एकूण थकबाकी २५0 कोटी ३४ लाख रुपये एवढी आहे. यापैकी १३६ कोटी ९५ लाख एवढी मूळ थकबाकी असून, त्यावर १११ कोटी ५५ लाख रुपये एवढे व्याज असून, दंडापोटीची रक्कम १ कोटी ८४ लाख एवढी आहे. कृषी संजीवनी योजनेत सहभागी शेतकर्यांना फक्त मूळ थकबाकी भरावी लागणार आहे.