अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून तिहेरी हत्याकांड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:11 AM2018-05-11T04:11:59+5:302018-05-11T04:11:59+5:30
धोतर्डी येथे क्रूर पित्याने अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून तीन मुलांची बुधवारी रात्री हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पत्नीचा मृत्यू करणीने झाल्याच्या संशयानंतर मुलीलाही मुंजाने पछाडल्याचा संशय विष्णू इंगळे यास आला होता.
- सचिन राऊत
अकोला - धोतर्डी येथे क्रूर पित्याने अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या संशयातून तीन मुलांची बुधवारी रात्री हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. पत्नीचा मृत्यू करणीने झाल्याच्या संशयानंतर मुलीलाही मुंजाने पछाडल्याचा संशय विष्णू इंगळे यास आला होता. त्यातून हे तिहेरी हत्याकांड घडले. इंगळे याने आत्महत्येचा प्रयत्न केला, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
विष्णू इंगळे याने दरवाजावर मजकुर लिहिला आहे, त्यात त्याच्या कुटुंबीयांवर जादूटोण्याचे प्रयोग केले असून त्यातून पत्नीचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. आता आमच्या चार जणांच्या कुटुंबावरही काळी जादू केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यावरून तिहेरी हत्याकांडाचे कारण स्पष्ट झाले आहे. माझ्यावरही करणी झाल्यामुळे मी मुलगा अजय, मनोज व मुलगी शिवाणी यांची हत्या केल्याचे इंगळे याचे म्हणणे आहे.
विष्णू इंगळे यांने नमूद कलेल्या मजकुरावरून हे हत्याकांड जादूटोणा व करणी प्रकाराशी संबंधित आहे. पोलिसांकडून अंधश्रद्धेच्या दिशेनेही तपास सुरू केला आहे. मात्र चिठ्ठीत करणी, काळी जादू व संशय यांसारखे शब्द वापरण्यात आले आहेत.
- सोहेल शेख, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर
१२ तासांनंतर पश्चात्ताप
तीन मुलांची बुधवारी रात्री हत्या केल्यानंतर इंगळे याने आत्महत्येचा प्रयत्न केला. शस्त्रांनी वार करून त्याने स्वत:ला विजेचे झटके दिले. गळफास घेतला. सुदैवाने इंगळे बचावला. गंभीर जखमी झालेल्या इंगळेला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे. गुरुवारी पहाटे त्याने तीनही मुलांच्या हत्येवर पश्चाताप व्यक्त केला.