अकोला लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 08:19 AM2024-04-26T08:19:10+5:302024-04-26T08:19:49+5:30
Lok Sabha Election 2024 : अकोला लोकसभा मतदारसंघात प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष मिळून एकूण १५ उमेदवार भाग्य आजमावित आहे.
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज, २६ एप्रिल रोजी अकोला मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदार क्षेत्रात उत्साहात मतदान सुरू झाले. दुपारी उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता लक्षात घेता सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे बघावयास मिळत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष मिळून एकूण १५ उमेदवार भाग्य आजमावित आहे.
यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, भाजपाकडून खासदार पूत्र अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील हे अकोला मतदारसंघातून रिंगणात आहेत. अकोला शहर व जिल्ह्यासह वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघ क्षेत्रातील २०५६ केंद्रांवर १८ लाख ९० हजार ८१४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहे.
मतदारसंघात महिलांसाठी सात विशेष केंद्र असून, दिव्यांगांसाठी रेड कार्पेट अंथरलेले विशेष मतदान केंद्र साकारण्यात आले आहे. काही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया प्रारंभ होण्यापूर्वीच मतदारांची गर्दी दिसून आली. सर्वच मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.