अमरावती जिल्ह्याला बसले भूकंपाचे १८ धक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 04:38 PM2018-08-22T16:38:21+5:302018-08-22T16:57:59+5:30
जिल्ह्यातल्या मेळघाटातील साद्राबाडी या गावात मंगळवार आणि बुधवारच्या रात्री २.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत भूकंपाचे तब्बल १८ धक्के बसले.
पंकज लायदे
अमरावती : जिल्ह्यातल्या मेळघाटातील साद्राबाडी या गावात मंगळवार आणि बुधवारच्या रात्री २.३० ते सकाळी ९ वाजेपर्यंत भूकंपाचे तब्बल १८ धक्के बसले. या धक्क्यांची तीव्रता इतकी अधिक होती की, प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या एका घराला तडे गेले. त्याशिवाय आणखी एक घर कोसळले. वारंवार होऊ लागलेल्या या धरणीकंपामुळे मेळघातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. भुकंपाच्या घटनेची दखल जिल्हा प्रशासनाने योग्य त्या गांभीर्याने घेतली नसल्याची तक्रार नागरिकांची आहे.
मेळघाटातील धारणी तालुक्यातील तापीनदीलगत असलेल्या साद्राबाडी या परिसरात १७ आॅगस्ट रोजी भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्याची तीव्रता कमी होजी. २१ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के पुन्हा जाणवले. सदर भुकंपाची तीव्रता पूर्वीच्या तुलनेत अधिक होती. सदर घटनेनंतर १५ तासांनी पुन्हा मध्यरात्री अडीच वाजतापासून धरणीकंप सुरू झाले. सकाळपर्यंत भूकंपाचे एकूण १८ धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता सर्वाधिक होती. प्राथमिक आरोग्य केंद्रालगतच्या प्रदीप सोनी यांच्या घराच्या भिंतीला तडे जाऊन अर्धे घर कोसळले. उपविभागीय अधिकारी राहुल कार्डिले आणि अधिनिस्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी साद्राबाडी गावाला भेट दिली.
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, कारवाई का नाही?
अधिकाऱ्यांनी तिसऱ्यांदा झालेला भुकंप गांभीर्याने घेतला. पहिल्या भुकंपांदरम्यान त्यांनी दुर्लक्ष का केले? दखल का घेतली नाही? गावकऱ्यांचे मनोधैर्य का वाढविले नाही? आपत्कालीन व्यवस्था का कार्यान्वित केली नाही? आदी प्रश्न अनुत्तरीत आहेत. आदिवासी गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारर्वाइची मागणी केली जात आहे.
इमारतीबाहेर रुग्णांची तपासणी
भूकंपाची तीव्रता वाढत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत रुग्णांच्या तपासणी न करता ती आवारात तंबू उभारून करण्यात आली. रुग्णांची तपासणी त्या तंबुतच सुरू आहे.
चिमुकल्यासोबत बाहेर काढली रात्र
मध्यरात्रीच भूकंपाच्या धक्क्याने जागी आलेल्या सोनी परिवारातील एका महिलेने चिमुकल्याच्या बचावासाठी घराबाहेरच अवघी रात्र जागून काढली.
या गावांना जाणवले भूकंपाचे धक्के
बुधवारच्या मध्यरात्री अडीच वाडता झालेल्या भूकंपाची तीव्रता परिसरातील धूळघाट रोड, सुसर्दा, नागुढाणा, झिलपी, खापरखेडा, गभेरी, भोकरबर्डी, दाबिदा, पानखाल्या या गावांना जाणवल्याची प्रशासनाची माहिती आहे.