बीटीची ९६ टक्के बोंडे किडली, सहा लाख हेक्टर बाधित; समितीचा अहवाल, शासन व कंपन्याद्वारा भरपाई केव्हा?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 11:42 PM2017-11-21T23:42:13+5:302017-11-21T23:42:47+5:30
राज्याचे ‘लँकेशायर’ अशी ओळख असलेल्या व-हाडाची यंदा गुलाबी बोंड अळीने वाट लावली आहे. सद्यस्थितीत कपाशीची ९६ टक्के बोंडे सडली असल्याचे जिल्हा समितीने तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या पाहणीत आढळून आले.
- गजानन मोहोड
अमरावती : राज्याचे ‘लँकेशायर’ अशी ओळख असलेल्या व-हाडाची यंदा गुलाबी बोंड अळीने वाट लावली आहे. सद्यस्थितीत कपाशीची ९६ टक्के बोंडे सडली असल्याचे जिल्हा समितीने तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या पाहणीत आढळून आले. कृषितज्ज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार, एकट्या अमरावती विभागात किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रातील बीटी कपाशी बोंडअळीने बाधित झाल्याने उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरविले जात आहे. मात्र, शासनस्तरावर सर्वेक्षणाचे आदेश नाहीत. केवळ तक्रारींच्या अनुषंगाने पाहणी व अहवाल सुरू असल्याची शोकांतिका आहे.
कपाशीच्या देशी वाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादनखर्चही निघत नव्हता. त्यामुळेच बोंड अळी प्रतिरोधी जिन्स असणा-या बीटी वाणाची लागवड अलीकडेच शेतक-यांनी सुरू केली. ‘मोन्सॅन्टो’ कंपनीद्वारा बियाण्यात बोंड अळीला प्रतिरोध असल्याचा दावाही जोरकसपणे करण्यात आला होता. काही संघटनांचा या विदेशी वाणाला विरोध होता. मात्र, उत्पादन खर्च वाढल्याने शेतक-यांनी बीटी वाणाला कल दिला. सुरुवातीची काही वर्षे वगळता गेल्या दोन वर्षात बीटी तंत्रज्ञान सपशेल अपयशी ठरले आहेत.
विभागात यंदाच्या खरिपात १० लाख हेक्टर कपाशीचे क्षेत्र आहे. यापैकी किमान सहा लाख हेक्टर क्षेत्रातील कपाशी गुलाबी बोंड अळीने उद्ध्वस्त झाली असल्याचा कृषितज्ज्ञांचा अंदाज आहे. यंदा तर कपाशीची वाढ पाच फुटांवर झाली आहे. शेतकºयांनी फवारणीवरही मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र, गुलाबी बोंड अळीची प्रतिरोधक्षमता वाढल्याने ती कीटकनाशकांनाही दाद देत नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत यासंदर्भात किमान २५० हून अधिक तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. या अनुषंगाने पूर्णानगर तेथील संजय माकोडे, प्रमोद इटके व उमेश महिंगे यांच्या शेतातील कपाशीची जिल्हास्तरीय समितीने पाहणी केली असता, कपाशीची सरासरी ९६ टक्के बोंडे किडली असल्याचे पाहणीत आढळून आले, तर प्रत्येक कपाशीच्या झाडाखाली ३० ते ४० दरम्यान किडलेली बोंडे होती. या शेतकºयांचे किमान १ लाख ३० हजार रुपये प्रतिएकर नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व तालुका कृषी अधिकारी असलेल्या समितीने दोन दिवसांपूर्वी दिला. त्यावरून जिल्ह्याची व विभागात असलेल्या नुकसानाची भीषणता लक्षात येते.
बॉक्स
सर्वेक्षणाचे आदेश नाहीत, तक्रारींवर पाहणी
विभागातील सहा लाख, विदर्भातील आठ लाख हेक्टरवर क्षेत्रातील बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा अॅटॅक झाला असतानाही शासनाद्वारा सर्वेक्षणाचे आदेश नाहीत. विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी याला दुजोरा दिला आहे. ज्या शेतकºयांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या, त्यांच्या तक्रारीवर तालुका व जिल्हा समिती पाहणी करीत आहेत. शेतकºयांचे किती नुकसान झाले, याचा अहवाल कृषी संचालकांना सादर होत आहे.
बोंड अळीने झालेल्या कपाशीच्या नुकसानासंदर्भात स्वतंत्र सर्वेक्षणाचे आदेश नाहीत. मात्र, शेतकºयांच्या तक्रारींच्या आधारे पाहणी करण्यात येत आहे व ‘जीएचआय’ फॉर्म भरून कृषी संचालकांकडे पाठविण्यात येत आहे.
- सुभाष नागरे
कृषी सहसंचालक