पाणी टंचाईसाठी १३९ खासगी विहिरींचे अधिग्रहण
By admin | Published: May 31, 2014 11:08 PM2014-05-31T23:08:47+5:302014-05-31T23:08:47+5:30
जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये जून २0१४ पर्यंतच्या अंतिम टप्प्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. जिल्ह्यामधील २३१ गावांत कमीअधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे.
अमरावती : जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेल्या पाणीटंचाईच्या कृती आराखड्यामध्ये जून २0१४ पर्यंतच्या अंतिम टप्प्यात पाणीटंचाई तीव्र झाली आहे. जिल्ह्यामधील २३१ गावांत कमीअधिक प्रमाणात पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईमध्ये शिथिलता येण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारा २१७ नवीन विंधन विहिरीचा पर्यायी उपलब्ध केला आहे.
उन्हाळ्याच्या अखेरीस पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे. या अखेरच्या टप्प्यात भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील खोल गेली आहे. त्यामुळे उंचसखल भागातील अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या दिवसात विद्युत भारनियमनदेखील ८ तासांवर सुरू असल्याने अनेक गावांत पाणी उपलब्ध असतानाही कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात तात्पुरती पूरक नळ योजनेंतर्गत १३ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. ७३ गावांमध्ये नळयोजनेची विशेष दुरूस्ती सुरू आहे.
या टंचाईग्रस्त २३१ गावांमध्ये २१७ नवीन विंधन विहिरी तयार करण्यात येत आहे. पाणी टंचाईमध्ये काही प्रमाणात शिथिलता यावी यासाठी १३९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ८ ते १0 गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच ऐनवेळी गोंधळ होऊ नये यासाठी ३0 टँकर प्रस्तावित केले आहेत. अशाप्रकारे पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी ४७२ प्रकारची विविध कामे जिल्ह्यात सुरू आहेत. (प्रतिनिधी)