वनक्षेत्राबाहेरील वाघांसाठी ‘अॅक्शन प्लॅन’; स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रणाली लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 02:13 PM2019-01-17T14:13:33+5:302019-01-17T14:15:19+5:30
वन्यजीव विभागाने वन्यजीव क्षेत्राबाहेरील वाघांसह अन्य वन्यजीवांचे व्यवस्थापनासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेंटिग सिस्टिम’ (एसओपी) लागू केली. याद्वारे वन्यजिवांचे संरक्षण, संवर्धन केले जाणार आहे.
गणेश वासनिक।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जागतिक व्याघ्रभूमी असलेल्या विदर्भातील वनक्षेत्राबाहेरील वाघांचे संरक्षण, संवर्धन धोक्यात आले आहे. मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. जंगलांचा ऱ्हास, वाघांचे संकुचित झालेले संचार मार्ग अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वन्यजीव विभागाने वन्यजीव क्षेत्राबाहेरील वाघांसह अन्य वन्यजीवांचे व्यवस्थापनासाठी ‘स्टँडर्ड ऑपरेंटिग सिस्टिम’ (एसओपी) लागू केली. याद्वारे वन्यजिवांचे संरक्षण, संवर्धन केले जाणार आहे.
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. यात मेळघाट, पेंच, ताडोबा, नवेगाव, नागझिरा व सह्याद्री यांचा समावेश आहे. मेळघाट, पेंच व्याघ्र प्रकल्पांतून वाघ बाहेर पडत नाहीत. मात्र, सन २०१७-२०१८ या वर्षांत राज्यात ६१ वाघांनी मानवावर हल्ले केल्याची नोंद लोकसभेतील अहवालातून स्पष्ट झाली आहे. वाघांच्या ६१ हल्ल्यांपैकी निम्म्याहून अधिक हल्ले चंद्रपूर जिल्ह्यात झालेत. गतवर्षी अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथील हल्ल्यात वाघाने दोघांचा बळी घेतला. परिणामी, वन्यजीव विभागाने ‘अॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. प्रादेशिक वनविभाग, वनविकास महामंडळांच्या क्षेत्रात वाघांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. राज्यात ६९ अभयारण्यांतील वाघांवरही लक्ष केंद्रित केले आहे. सन २००४ मध्ये वाघांच्या व्यवस्थापनाविषयी नियोजन करण्यात आले. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. सन २०१८ मध्ये यात सुधारणा करण्यात आली असून, मानक संचालन प्रणालीद्वारे वनक्षेत्राबाहेरील वाघांचे संरक्षण, संवर्धन केले जाणार आहे.
नव्या अॅक्शन प्लॅनचे स्वरूप
वन्यजीव व्यवस्थापन आराखडा तयार करणे. वन्यप्राण्यांचे अस्तित्व असलेल्या क्षेत्रात अधिवास विकासाची कामे करणे. वन्यजीव संरक्षणासाठी गुप्तवार्ता- माहितीचे जाळे विणणे. वन्यजिवांच्या संरक्षणासाठी वनविभाग, वनविकास महामंडळ आणि वन्यजीव विभागाने समन्वय ठेवणे. जिल्हा व्याघ्र कक्षातर्फे संयुक्त गस्त. वन्यजीव संरक्षणासाठी उपाययोजना. वन्यप्राण्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे. वन्यजीव संरक्षणासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समितीची मदत घेणे. वन्यप्राणी उपसमिती नेमणे. वन्यप्राण्यांचा व्यापार रोखणे. मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ठोस उपाययोजना.
नवीन अॅक्शन प्लॅनमुळे वनक्षेत्राबाहेरील वाघांचे संरक्षण, संवर्धन करणे सुकर होईल. वनविभागाच्या सर्वच यंत्रणांना समन्वय साधला जाणार आहे. त्यामुळे वाघ, बिबटसह अन्य वन्यजिवांच्या संरक्षणाला प्राधान्य असणार आहे.
- सुनील लिमये
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव) नागपूर.
वनक्षेत्राबाहेरील वाघांच्या संरक्षणाची विदर्भात मोठी समस्या आहे. वाघांचे संचार मार्ग बंद झालेत. जे काही असतील, ते असुरक्षित आहेत. वाघांना मुक्त संचार करता येत नाही. नवीन रस्ते निमिर्तीत जंगलाशेजारील मार्गामध्ये भुयारी मार्गाची निर्मिती आवश्यक आहे, अन्यथा मानव- वन्यजीव संघर्ष कायम राहील.
- यादव तरटे पाटील,
वन्यजीव अभ्यासक, अमरावती.