अमरावती विभागातील तीन हजार गावांमध्ये आॅनलाइन सातबारा, विभागात पाच जिल्ह्यांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 05:12 PM2017-08-28T17:12:21+5:302017-08-28T17:12:55+5:30
अचूक संगणकीकृत सातबारा आणि ८ ‘अ’ साठी तलाठी, मंडळ अधिका-यांनी चावडी वाचनाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरूवार २४ आॅगस्टपर्यंत अमरावती विभागातील ७ हजार ४६५ गावांपैकी ३ हजार ०८७ गावांमध्ये सातबारा प्रक्रिया आॅनलाइन झाली असून लवकरच इतरही गावांमध्ये हा बदल घडून येणार आहे. यासाठी महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.
- जितेंद्र दखने
अमरावती, दि. 28 - अचूक संगणकीकृत सातबारा आणि ८ ‘अ’ साठी तलाठी, मंडळ अधिका-यांनी चावडी वाचनाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. गुरूवार २४ आॅगस्टपर्यंत अमरावती विभागातील ७ हजार ४६५ गावांपैकी ३ हजार ०८७ गावांमध्ये सातबारा प्रक्रिया आॅनलाइन झाली असून लवकरच इतरही गावांमध्ये हा बदल घडून येणार आहे. यासाठी महसूल यंत्रणा कामाला लागली आहे.
राज्यात सन २००२ पासून सातबारा संगणकीकृत करण्यात आले असून त्यात चुका आढळून येत होत्या. तसेच नोंदी आॅनलाइन करण्यासाठी केंद्रपुरस्कृत ‘डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन’ प्रोेगाम कार्यान्वित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफार प्रणाली विकसित केली आहे. त्याआधारे राज्यात ई-फेरफार केले जात आहेत. राज्यभरातील संबंधित महसूल यंत्रणेद्वारे सातबाराचे सर्व्हे नंबर योग्यप्रकारे लिहिणे, अचूक संगणकीकृत सातबारा आणि आठ ‘अ’ साठी तब्बल २४ मुद्यांवर तपासणी केली जात आहे. अमरावती विभागात ५६ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामध्ये ७ हजार ४६५ महसुली गावे आहेत. त्यामधून आतापर्यंत ३ हजार ०८७ गावांमध्ये चावडी वाचन करण्यात आले आहे.
अमरावती विभागातील जिल्हानिहाय गावे...
अमरावती - ६६५
बुलडाणा - ३५१
यवतमाळ - ५३७
अकोला - ९२७
वाशिम - ६०७