'त्या' अपहृत बालिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला
By admin | Published: November 26, 2014 10:57 PM2014-11-26T22:57:57+5:302014-11-26T22:57:57+5:30
मानलेल्या मामाने अपहरण केलेल्या एका ९ वर्षीय बालिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बडनेऱ्यापासून १ कि.मी. अंतरावरील एका शेतात बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आढळून आला.
बडनेरा : मानलेल्या मामाने अपहरण केलेल्या एका ९ वर्षीय बालिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बडनेऱ्यापासून १ कि.मी. अंतरावरील एका शेतात बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास आढळून आला. याप्रकरणात हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. आरोपी अद्यापही मोकाट आहे. या घटनेने बडनेऱ्यात खळबळ उडाली आहे.
नीता सुधीर पाठक (९, रा. पाचबंगला, बडनेरा), असे मृताचे नाव आहे. एकनाथ घनश्याम वाडेकर (३५, रा. काटआमला), असे आरोपीचे नाव आहे. तो मृत नीता हिचा मानलेला मामा होय. बुधवारी दुपारी १ वाजता बडनेरा-काटआमला मार्गावरील रहेमान खाँ यांच्या शेतात बालिकेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. या बालिकेचा मृतदेह तीन ते चार दिवसांपासूनचा असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तिच्या अंगावर लाल-पिवळ फ्रॉक व लाल रंगाचे लेगीन होते. ही माहिती पोलिसांना मिळताचा सहायक पोलीस आयुक्त साखरकर, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू व तपास अधिकारी उपनिरीक्षक पवार यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले.
आठ दिवसांनंतर आढळला मृतदेह
नीताचा मानलेला मामा एकनाथ वाडेकर याने १९ नोव्हेंबर रोजी दुपारी नीताची आई घरी नसताना तिला सोबत नेले. दोन वर्षांनी मोठा असलेल्या भावाला सांगून तो नीताला सोबत घेऊन गेला. यापूर्वीही त्याने नीताला त्याच्या गावाला सोेबत नेले होते. दोन-तीन दिवसांनी त्याने तिला परत आणले होते. यावेळी मात्र तो नीताला परत घेऊन आलाच नाही. आठ दिवसानंतर तिचा मृतदेहच काटआमला मार्गावरील शेतात आढळून आला.
आरोपीला अटक करण्यात पोलिसांना अपयश
याप्रकरणातील आरोपी एकनाथ वाडेकर याला गजाआड करण्यात बडनेरा पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. १९ नोव्हेंबर रोजी नीताचे अपहरण झाले आणि २३ नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल झाली. परंतु आरोपीचा शोध लागलेला नाही.