समाजमंदिर नव्हे, शौचालय बांधा
By admin | Published: November 4, 2015 12:20 AM2015-11-04T00:20:59+5:302015-11-04T00:20:59+5:30
स्थानिक वडाळी मातंगपुरा परिसरात सार्वजनिक शौचालय असलेल्या जागेवर समाजमंदिर बांधण्याचा घाट नगरसेवकांनी रचला आहे.
वडाळीतील महिलांची मागणी : विलास इंगोले यांनी सोडविला प्रश्न
अमरावती : स्थानिक वडाळी मातंगपुरा परिसरात सार्वजनिक शौचालय असलेल्या जागेवर समाजमंदिर बांधण्याचा घाट नगरसेवकांनी रचला आहे. ही बाब परिसरातील महिलांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांचा लक्षात आणून दिली. त्यामुळे समाजमंदिर नव्हे, शौचालय बांधून द्या, अशी मागणी महिलांनी केली. दरम्यान स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांच्या पुढाकाराने ही समस्या क्षणात सोडविण्यात आली.
वडाळी परिसरातील अण्णाभाऊ साठे नगरात फार वर्षांपुर्वीचे सार्वजनिक शौचालय आहे. मात्र हे शौचालय जमिनदोस्त करुन त्या जागेवर समाजमंदिर निर्माण करण्याचा घाट नगरसेवक रचत असल्याची बाब महिलांनी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या लक्षात आणून दिली. शौचालय हटविल्या गेल्यास महिला, युवती व आबालवृद्धांना उघड्यावर शौचास जावे लागेल, असे महिलांनी सांगितले. शौचालय दुरुस्ती करण्याऐवजी तो पाडण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. समाजमंदिराच्या नावे मंजूर झालेला निधी शौचालय बांधण्यासाठी वापर करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी स्थायी समिती सभापती विलास इंगोले यांनी वडाळी परिसरातील महिलांच्या समस्यांना तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. विलास इंगोले यांनी क्षणात आयुक्त गुडेवार यांच्याकडून शौचालय ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश करुन घेतले. परिणामी मागणी घेऊन आलेल्या महिलांचा तासभरात प्रश्न सुटल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळक त होता, हे विशेष. माला खंडारे, मंगला खडसे, वंदना खडसे, मजाबाई खडसे, संगीता खडसे, पंचाबाई गवई, संगीता खडसे, ज्योती खडसे, वर्षा थोरात, सुनीता ठाकूर, मयुरी खडसे, सोनाली खडसे, शीला थोरात आदी महिलांनी शौचालय कायम ठेवण्याचा प्रश्न पोटतिडकीने मांडला. (प्रतिनिधी)