‘चकर, मकर क्या देखो, फगवा दे मेको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 10:12 PM2018-03-03T22:12:46+5:302018-03-03T22:12:46+5:30
‘बेचो तुम्हारी जोरू का लहंगा, देओ हमारा फगवा देओ, धोटा (मर्द) हो ठहरो रे, जपाय (औरत) हो तो भागो रे, होली का डांडा जली गयो रे, देओ हमारा भगवा देओ’’ हे सूर आता मेळघाटातील गावागावांत ऐकावयास मिळू लागले आहे.
आॅनलाईन लोकमत
चिखलदरा/धारणी : ‘बेचो तुम्हारी जोरू का लहंगा, देओ हमारा फगवा देओ, धोटा (मर्द) हो ठहरो रे, जपाय (औरत) हो तो भागो रे, होली का डांडा जली गयो रे, देओ हमारा भगवा देओ’’ हे सूर आता मेळघाटातील गावागावांत ऐकावयास मिळू लागले आहे. ‘चकर, मकर क्या देखो, फगवा दे मेको’ अशी फगवा गीते गात आदिवासी युवक-युवती रस्त्यावर उतरले असून, शनिवारपासून बुधवारपर्यंत हा कार्यक्रम मेळघाटात चालणार आहे.
मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या सर्वात मोठे होळी सणाला शनिवारपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. आपापल्या गावातील होळी जाळल्यानंतर आता महिलांची टोळी दुसऱ्या गावात फगवा मागण्यासाठी निघाल्या आहेत. ज्यांच्याशी त्यांची ओळख असते, अशा लोकांकडून हक्काने फगवा मागणे सुरू आहे. बळजबरी न करता, जे मिळेल ते स्वीकारीत घराघरांतून फगवा वसुली करण्यात येत आहे. पंधरा दिवस कुठल्याच कामावर न जाता होळीचा आनंद आदिवासी घेणार आहेत.
परतवाड्यात होळी पूजन
परतवाडा : जुळ्या शहरांत स्थानिक आदिवासी समाजबांधवांचा होळी पूजन महोत्सव श्रीक्षेत्र वाघामाता मैदानात पार पडला. १० वर्षांपासून आदिवासी समाज संघटना व आदिवासी होळी समिती यांच्यावतीने हा आयोजित केला जातो. अध्यक्षस्थानी दादुजी धुर्वे होते. यावेळी माजी आमदार केवलराम काळे, जि.प. सदस्य दयाराम काळे, सभापति कविता काळे, सुभाष जांभेकर, तुुकाराम काळे, रूपलाल बेठेकर, समिती अध्यक्ष काकडे, महादेवराव कासदेकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जांगडी को देखो तो...
मेळघाटच्या घाटवळणातील नागमोडी रस्त्यावर युवक-युवतींचे मानवी नाके पाच दिवस दिसणार आहे. जांगडी (शहरी माणूस) ची वाहने रस्त्यावर लावलेल्या दगड, लाकडाने अडवून फगवा वसूल केला जात आहे. पाच दिवस फगवा वसूल झाला की, त्यातून जुलू (मटण), सिड्डू (दारू) आणि चावली (भात) पुरीचे जेवणाची पंगत गावशिवारावर उठणार आहे. एकंदर मेळघाटातील आदिवासींच्या विश्वात आनंदाचे वातावरण आहे. वर्षभर जमा करून ठेवलेली पुंजी मनसोक्त होळीच्या रंगात उधळत असल्याचे चित्र आहे.
ढोल-बासरीचा मधुर नाद
होळी पूजन महोत्सवात आदिवासी कोरकू समाजाचे सांस्कृतिक ढोल-बाँसुरी पथक होते. लोकनेता, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आबालवृद्धांनी या वाद्यांच्या तालावर पारंपरिक गादली-सुसुन नृत्य केले.