डेटा लिक; तपास सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 11:28 PM2017-10-18T23:28:37+5:302017-10-18T23:29:05+5:30
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या काही खातेदारांचा डेटा लिक झाल्यामुळे त्यांच्या खात्यातून पैसे चोरी केले जात असल्याचा निष्कर्ष सायबर सेलने काढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या काही खातेदारांचा डेटा लिक झाल्यामुळे त्यांच्या खात्यातून पैसे चोरी केले जात असल्याचा निष्कर्ष सायबर सेलने काढला आहे. मात्र, डेटा कोठून लिक झाला आणि कोणी केला असावा, यासाठी पोलीस विभागाच्या व एसबीआयच्या सायबर सेलकडून कसून तपासणी केली जात आहे.
एसबीआय खातेदारांच्या खात्यातून परस्पर रोख काढणाºया गुन्हेगारांनी अमरावती शहरातील काही बँक खातेदारांची गोपनीय माहिती मिळविली आहे. त्याआधारे एटीएम क्लोन करून खात्यातून पैसे लंपास केले जात असल्याचा संशय पोलिसांना आला आहे. 'एटीएम स्वॅप' करताना ही माहिती लिक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून त्या दिशेने सायबर सेल यंत्रणा तपास करीत आहे. आतापर्यंत शहरातील पाच नागरिकांच्या बँक खात्यातून लाखोंची रोख चोरी करण्यात आली. ही रोख हरियाणा, गुडगाव व आसाम शहरातून विड्रॉल करण्यात आल्याचे विवरण बँकेकडून खातेदारांना प्राप्त झाले आहे. राज्यात अशाप्रकारची फसवणूक करणारे अनेक जण सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. खातेदारांची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रोख पळविली आहे. याबाबत अमरावती पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क करून सर्व दिशेने तपासकार्य सुरू केले आहे.
बँक खातेदारांची इत्थंभूत माहिती बँकेत गोपनीय असते. ती बँक अधिकारी व कर्मचाºयांनाच माहिती असते. त्यामुळे बँकेतून खातेदारांची माहिती लिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीनेही पोलीस तपास करीत आहे.
एटीएममध्ये सुरक्षेचा अभाव
एसबीआयच्या बहुतांश एटीएम सुरक्षा रक्षकच नसल्याचे दिसून येते. अशा एटीएमवर सायबर गुन्हेगार लक्ष वेधून असू शकतात. अमरावती शहरातूनच बँक खातेदारांची माहिती लिक झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली असून हा डाटा कोठून लिक झाला याचा शोध पोलीस घेत आहे.
पासवर्ड बदलवत रहा
बँक खातेदारांनी एटीएम पासवर्डची माहिती कोणालाही सांगू नये, बाजारपेठेत खरेदी करताना किंवा पेट्रोलपंपावर 'एटीएम स्वॅप' करताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी शक्यतो एटीएमचा 'पासवर्ड' बदलवीत राहण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.
बँक खातेदारांच्या फसवणूक प्रकरणात डेटा लिक कोठून झाला, याचा शोध सायबर सेल घेत आहे. मुंबई सायबर सेलशी संपर्क करण्यात आला आहे.
- दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त