नागरिकांच्या आशेवर पाणी, मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावाचा विकास शून्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 05:06 PM2017-11-26T17:06:42+5:302017-11-26T17:19:51+5:30
गावाचा विकास होणार व कित्येक वर्षांपासून वंचित असलेल्या आपल्या गावातही लवकरच सुविधा उपलिब्ध होतील, अशी आशा नागरिकांना होती. मात्र,
सूरज दहाट
तिवसा (अमरावती) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिवसा तालुक्यातील शिरजगाव (मोझरी) हे गाव दत्तक घेतले. यामुळे गावाचा विकास होणार व कित्येक वर्षांपासून वंचित असलेल्या आपल्या गावातही लवकरच सुविधा उपलिब्ध होतील, अशी आशा शिरजगावच्या नागरिकांना होती. मात्र, मागील आठ महिन्यांत विकासाच्या केवळ प्रतीक्षाच असल्याचे वास्तव समोर आले आहे.
शिरजगाव (मोझरी) हे तालुका मुख्यालयापासून १० किमी, तर राष्ट्रीय महामार्गापासून ४ कि मी अंतरावर आहे. चार हजार लोकसंख्या असलेल्या या गावात कधी काळी निर्माण करण्यात आलेल्या सुविधा आजही कायम आहे. गावात जिल्हा परिषदेची व एक खासगी शाळा आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेची दूरवस्था झाली आहे. गावात शेती सिंचनासाठी दोन तलाव आहेत. मात्र दोन्ही तलावांत पाण्याचे नियोजन होत नाही. परिणामी शेतकºयांना ओलिताविना शेती करावी लागते. गावातील शंभराहून अधिक शेतकºयांवर कर्जाची टांगती तलवार आहे. गावापर्यंत पोहचण्यासाठी खड्यातून वाट काढावी लागते. गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून आठवड्यात एकदा भरणाºया आठवडी बाजाराची घाण पुढील बाजाराच्या दिवशीपर्यंत तशीच पडलेली असते. नाल्यांची स्वच्छता होत असल्याने दुर्गंध परसलेला आहे. गावातील सार्वजनिक वापराच्या स्वच्छता गृहांची अवस्था दयनीय झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी गावा दत्तक घेतल्यावर त्यात सुधारणा होतील, अशी अपेक्षा फोल ठरली आहे.
प्रतिनिधी सरकारचे गोडवे गाणारा
आठ महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी स्वप्निल देसळे गावात आले. आता आपल्या गावाला सोन्याचे दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासावर स्थानिकांशी चर्चा करण्यास नागरिकांनी पुढाकार घेतल्यावर प्रतिनिधी फक्त सरकारचे गुणगान करीत असल्याचे मत गावकºयांनी नोंदविले.
अवैध दारूविक्रीला उधाण
शिरजगावात दारूबंदी होती. आता गावात खुल्या पद्धतीने अवैध देशी दारू व गावठी दारू काढली जात असल्याचे चित्र आहे. यामुळे गावकºयांसह युवा वर्ग दारूच्या आहारी जात आहेत. दारू बंदीसाठी उभारलेला नागरिकांचा लढादेखील अयशस्वी ठरला आहे. दारू विक्रीची तक्रार करावी तरी कुणाकडे, अशी अवस्था आहे.
गाव दत्तक घेऊन मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधी नेमला असेल, तरी गावाचा विकास न होणे हे सरकारचे अपयशच आहे. येथील रहिवाशांचे हाल होत आहेत.
- यशोमती ठाकूर,
आमदार, तिवसा
समस्या मात्र सुटत नसल्याने उंचावलेल्या आशा मावळू लागल्या आहेत. रस्ता नाही, गाव व्यसनाधीन झाले, कुणीच लक्ष देत नाही. विकास होणार कसा?
- चंदू हगवणे,
नागरिक शिरजगाव
मागील आठ महिन्यांत गावात विकासकामे झाली नाहीत. मूलभूत सुविधा नाहीत, शेतीला जोड व्यवसाय नसल्याने युवकांचे लग्न जुळणे कठीण होत आहे.
- विजय डोंगरे,
युवक, शिरजगाव