कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:37 AM2018-02-16T01:37:41+5:302018-02-16T01:39:02+5:30
सन २०१२ पासून विभागाला वारंवार मागणी व विनंती करून न्याय न दिल्याच्या निषेधार्थ १५ फेब्रुवारीपासून ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी काम बंद आंदोलन छेडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सन २०१२ पासून विभागाला वारंवार मागणी व विनंती करून न्याय न दिल्याच्या निषेधार्थ १५ फेब्रुवारीपासून ग्रामीण रस्ते विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेने राज्यव्यापी काम बंद आंदोलन छेडले आहे. विद्यापीठ मार्गावर असलेल्या बांधकाम विभागाच्या कार्यालयात कर्मचारी आंदोलनाला बसले आहे.
प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कर्मचाऱ्यांसह राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता तसेच सकारात्मक निर्णय होईपर्यंत सदर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विकास डेकाटे यांनी सांगितले.
विभागाला सन २०१२ पासून वेतनवाढ व अपघात विमा देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी आहे. कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतन मिळत असून, सन २०१२ पासून एक रुपयाही पगारवाढ देण्यात आली नसल्याचे सदर मागणीत म्हटले आहे तसेच कुठलाही प्रकारे अपघाती विमा लागू नसून, महिला कर्मचाऱ्यांनाही प्रसूत रजादेखील मिळत नसल्याचे म्हटले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एका कनिष्ठ अभियंत्याला अपघात झाला. त्याचा उपचाराअंती मृत्यू झाला; पण शासनाने त्याला कुठलेही मदत केलेली नाही. अशा विविध मागण्यासंदर्भात राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी उपाध्यक्ष आशिष कराळे, सचिव सुनील पळसकर, कोषाध्यक्ष विनोद पठाडे यांच्यासह बहुतांश कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.