आधी सैनिक, मग उत्कृष्ट तलाठी आणि आता ‘सुपर रांडोनियर्स’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:08 PM2017-10-27T15:08:26+5:302017-10-27T15:08:56+5:30
संपूर्ण जगाला वेड लावलेल्या सुपर रांडोनियर्स ग्रुपचा ६०० किमीचा टप्पा पार करून वरूडचे तलाठी देवानंद मेश्राम सुपर रांडोनियर्स ठरले आहेत. हे अंतर त्यांनी केवळ ३६ तास ४८ मिनिटांत कापले.
संजय खासबागे
अमरावती : संपूर्ण जगाला वेड लावलेल्या सुपर रांडोनियर्स ग्रुपचा ६०० किमीचा टप्पा पार करून वरूडचे तलाठी देवानंद मेश्राम सुपर रांडोनियर्स ठरले आहेत. हे अंतर त्यांनी केवळ ३६ तास ४८ मिनिटांत कापले.
प्रदूषणमुक्त वातावरणाकरिता आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर सायकलिंग स्पर्धांचे आयोजन फ्रांसच्या सुपर रांडोनियर्सतर्फे विविध देशांत केले जाते. या स्पर्धेत वेगवेगळे टप्पे आहेत. नियमानुसार, एका वर्षात २०० किमी अंतर १३ तास ३० मिनीट, ३०० किमी अंतर २० तास, ४०० किमी अंतर २७ तास आणि ६०० किमी अंतर ४० तासांत पूर्ण करण्यास सुपर रांडोनियर्सचा खिताब मिळतो.
माजी सैनिक असलेले तलाठी मेश्राम यांनी हा बहुमान पटकावला आहे. त्यांनी या स्पर्धेत भाग घेताना जलसंवर्धन, जलयुक्त शिवाराचा पोस्टरद्वारे प्रचार केला. यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये शासकीय यंत्रणेद्वारे त्यांचा सत्कार करण्यात आला. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट तलाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता आमिर खान यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.