उड्डाणपुल बांधकामाचे भिजत घोंगडे
By admin | Published: November 10, 2016 12:11 AM2016-11-10T00:11:16+5:302016-11-10T00:11:16+5:30
: नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लवकरच पुर्णत्वास नेऊ असा शब्द संबंधित कंत्राटदाराने ....
बडनेरा मार्गावर वाहनधारकांचे हाल : कंत्राटदाराच्या मनमानीचा अतिरेक
बडनेरा : नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लवकरच पुर्णत्वास नेऊ असा शब्द संबंधित कंत्राटदाराने खासदार आनंदराव अडसुळांना दिला होता. मात्र, उड्डाणपुलाचे काम अजून किती अवधी घेणार हा प्रश्न वाहनचालकांसाठी मन:स्तापाचा ठरत आहे. गेल्या चार वर्षांपासून कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याचे डांबरीकरण झाले नाही.
अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग येथे गेल्या चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. या मार्गावर वाहतुकीची सतत रेलचेल असते. बडनेऱ्यात रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून मोठ्या संख्येत रेल्वे गाड्यांची ये- जा राहते. पर्यायाने अमरावती शहरासह जिल्ह्यातील प्रवासी बडनेऱ्यातूनच प्रवास करतो. त्यामुळे अमरावती ते बडनेरा मार्गावर शहर बसेस, आॅटो इतर चारचाकी, दुचाकी वाहनांची गर्दी ही नित्याचीच बाब आहे. तसेच नियमित अमरावती ते बडनेरा येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. खड्ड््यांमध्ये बारीक गिट्टी टाकण्यात आली आहे. येथे वाहनांमुळे धुळच धूळ राहते. अशातच खराब रस्त्यांचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. खासदार आनंदराव अडसुळ यांनी हा उड्डाणपुल लवकरच शहरवासिंयाच्या सेवेत सुरू होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अद्यापपर्यंत उड्डाणपुलाचे काम पुर्णत्वास गेलेले नाही. अजून किती अवधी लागणार असा प्रश्न पुढे आला आहे. या मार्गावरून मोठ्या संख्येत रुग्णवाहिका जात असताना या नादुरुस्त रस्त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत आहे. सदर कंत्राटदार थातुरमातूर रस्ता बनवून वेळ काढूपणाचे धोरण आखत असल्याचे चित्र आहे. चार वर्षात कंत्राटदाराने रस्त्याचे डांबरीकरण केले नाही. या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे, अशी सर्वसामान्यांची हाक आहे. आठवडा भरात रस्ता दुरुस्त केला नाही तर तीव्र आंदोलन करु, असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड, विलास वाडेकर यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
खासदारांनी पुन्हा घ्यावा पुढाकार
नरखेड रेल्वे क्रॉसिंगजवळील उड्डाणपुलाचे काम लांबतच चालले आहे. गेल्या चार वर्षांपासून येथून नादुरुस्त रस्त्यांवरून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे. याचा मोठा मन:स्ताप होत आहे. उड्डाणपुलाचे काम होईस्तोवर डांबरीकरणाचा रस्ता करण्यात यावा, अशी मागणी आहे. खासदार आनंदराव अडसूळ यांनीच यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असेही बोलले जात आहे.