गुन्हेगारी हाताने साकारले गणराया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:13 PM2018-09-02T22:13:57+5:302018-09-02T22:14:23+5:30
उत्तुंग पाषाण भिंतीच्या आत हातून कळत-नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रूपात प्रायश्चित करीत असलेले बंदीजन गणरायांच्या मूर्ती साकारत आहेत. नाशिकनंतर अमरावती मध्यवर्ती कारागृहात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जात आहे. बंदीजनांच्या कलाकुसरीतून साकारलेल्या मूर्ती लक्ष वेधत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उत्तुंग पाषाण भिंतीच्या आत हातून कळत-नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रूपात प्रायश्चित करीत असलेले बंदीजन गणरायांच्या मूर्ती साकारत आहेत. नाशिकनंतर अमरावती मध्यवर्ती कारागृहात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जात आहे. बंदीजनांच्या कलाकुसरीतून साकारलेल्या मूर्ती लक्ष वेधत आहेत.
कारागृह प्रशासन बंदीजनांसाठी सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत विविध उपक्रम राबवितात. येथील मध्यवर्ती कारागृहाने बंदीजनांतील सुप्त गुण व त्यांच्या कलाकुसरीचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे कार्य साकारत आहे. कारागृह प्रशासनाकडून सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत विविध कार्यक्रमांतून बंदीजनांना चांगला माणूस घडविण्याचे कार्य सातत्याने सुरू असते. त्यामुळे गुन्हेगारी अशी ओळख असलेल्या सहा बंदीजनांच्या हाताने सुबक, आकर्षक, देखण्या गणेशमूर्ती साकारण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. आतापर्यंत ६० मूर्ती तयार केल्या असून, ७०० ते ९०० रूपयांपर्यंत एका मूर्तीला मोजावे लागतील, अशी माहिती आहे. गणेशमूर्ती साकारण्यात बंदीजन व्यस्त असल्याचे चित्र आहे. गणेशमूर्ती विक्रीतून मिळणारी रक्कम शासन तिजोरीत जमा होईल व बंदीजनांनाही या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्तांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन
बंदीजनांनी साकारलेल्या गणेशमूर्ती विक्री स्टॉलचे उद्घाटन १० सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त संजय बावीस्कर यांच्या हस्ते हाईल. कारागृह प्रशासनाच्या स्टॉलवर गणेशमूर्ती विक्रीस उपलब्ध राहीले. गणेश भक्तांनी स्टॉलवरून मूर्ती विकत घेऊन कारागृह प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश मूर्ती साकारण्यासाठी बंदीजनांनी प्रशिक्षण घेतले नाही. ५ ते ६ कैद्यांना जुजबी कला अवगत आहे. त्याआधारे शाडू माती व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. १० सप्टेंबरपासून मूर्ती विक्रीस उपलब्ध राहील.
- रमेश कांबळे,
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह