UPSC: तुकाराम मुंढेंच्या भाषणाने प्रभावित झाली, पेंटरची मुलगी UPSC तून अधिकारी बनली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 04:07 PM2022-10-12T16:07:51+5:302022-10-12T16:10:37+5:30
गरीबाच्या लेकीने मिळवलेल्या यशामुळे गुणवत्ता ही परिश्रमाच्या बळावरच मिळवता येते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे
अमरावती - महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांची क्रेझ निर्माण झाली असून स्पर्धा परीक्षेत मुलींचा टक्का वाढला आहे. गतवर्षीच्या निकालात १०० हून अधिक मराठी उमेदवारांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले होते. त्यामध्ये, अनेक गरीब कुटुंबातील मुलं-मुली होत्या. अमरावतीमधील बिच्छू टेकडी हा अनेकांसाठी दुर्लक्षित करण्यात आलेला भाग त्यातही वीट भट्टीचा परिसर. या भागात राहणाऱ्या रंग कामगाराच्या मुलीने यशाचे शिखर गाठले आहे. तिने यूपीएससीचा अवघड प्रवास यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे तुकाराम मुंढेंच्या भाषणाने आपण प्रभावित झालो, असे पल्लवीने माध्यमांशी बोलताना सांगितले.
गरीबाच्या लेकीने मिळवलेल्या यशामुळे गुणवत्ता ही परिश्रमाच्या बळावरच मिळवता येते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पल्लवी देविदास चिंचखेडे असे या गुणवंत युवतीचे नाव. केंद्रीय लोकसेवा आयोगाने १० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२१ मधील गुणवत्तेच्या आधारावर राखीव ठेवलेल्या उमेदवारांच्या यादीत तिची निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा २०२१ चा निकाल हा ३० मे २०२२ रोजी प्रसिद्ध झाला होता. मात्र, काही जागा गुणवत्तेच्या आधारे राखीव ठेवण्यात आल्या होत्या, आयोगाच्या शिफारशीनुसार या जागांसाठी ६३ उमेदवारांची यादी जाहीर झाली, यापैकी पल्लवी हिची प्रवर्गातून एकमेव निवड झाली आहे.
नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. यात अमरावती शहरातील वडाळी परिसरात राहणारी पल्लवी चिंचखेडे ६३ रँक घेऊन पास झाली आहे. अत्यंत हालाखीची परिस्थिती असताना, परिस्थितीवर मात करीत तिने घवघवीत यश संपादन केले. पल्लवीचे वडील रंगकाम करतात. आई शिवणकाम करते. एक धाकटी बहीण आणि भाऊ अस कुटुंब पल्लवीच आहे. पल्लवीने बी. ई. मेकॅनिकचे शिक्षण घेऊन खासगी कंपनीत नोकरी केली. या दरम्यान तिने तुकाराम मुंढे यांचं भाषण बघितलं, भाषण मनाला प्रभावित करून गेलं. त्यानंतर तिने आयएएस व्हायचं ठरवलं. नोकरी करुन कमावलेल्या पैशातून पुढील अभ्यासाकरिता तिने दिल्ली गाठली अन् युपीएससी क्रॅक करण्याचं ध्येय पूर्णत्वास नेलं.
दरम्यान, माध्यमांशी बोलताना पल्लवीने स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना मौलिक संदेश दिला आहे. पल्लवीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केल्याने आई वडिलांना तिचा सार्थ अभिमान वाटतो आहे. परिसरातून देखील पल्लावीवर शुभेच्छाचा वर्षाव होतो आहे.
आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू
यूपीएससीचा हा खडतर प्रवास पल्लवीने मोठ्या कष्टाने केला झोपडपट्टी भाग म्हणून आता आमच्या परिसराची हे टाळणे कोणी करू शकणार नाही, असे डोळ्यात आनंदाश्रू आणत वडील देविदास व आई सुनीता यांनी 'लोकमत'ला सांगितले. देविदास चिंचखेडे हे रंगकाम करतात तर सुनिता या शिलाई मशीन चालवून तिन्ही मुलांचे पालन पोषण करतात. बड्या अधिकाऱ्यांच्या घरी रंगकाम करीत असताना आपली ही मुले अशी मोठ्या पदावर जावी ही मनीषा देविदास चिंचखेडे बाळगून होते.