बिरबलाची खिचडी ठरतेय गुटख्याचा तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:04 PM2018-03-06T23:04:06+5:302018-03-06T23:04:06+5:30
दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मार्गावर पकडलेल्या २० लाखांच्या गुटख्याचा तपास बिरबलाच्या खिचडीप्रमाणे सुरू आहे. महिना लोटूनही माल कुणाकडे जात होता आणि मुख्य आरोपी कोण, हे उघड झालेले नाही.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मार्गावर पकडलेल्या २० लाखांच्या गुटख्याचा तपास बिरबलाच्या खिचडीप्रमाणे सुरू आहे. महिना लोटूनही माल कुणाकडे जात होता आणि मुख्य आरोपी कोण, हे उघड झालेले नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनात २० लाखांच्या गुटख्याची खिचडी तर शिजत नाही ना, असे बोलले जात आहे.
दर्यापूर-अंजनगाव सुर्जी टी-पॉइंटवर दर्यापूर पोलिसांनी बाराचाकी ट्रकमधून पानमसाला मिश्रित गुटखा व सुगंधित सिगारेटचा माल २४ जानेवारीला जप्त केला. सुरुवातीला त्याची किंमत पोलिसांकडून ४३ लाख ६८ हजार १३५ रुपये सांगण्यात आली. नंतर तपासात २० लाखांचा माल आढळला. त्यामध्ये सहा लाखांच्या सुगंधित सिगारेट होत्या. ठाणेदार मुकुंद ठाकरे यांनी लाखो रुपयांचा माल जप्त केला; पण पोलिसांना कारवाईचे आदेश नसल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात माल देऊन पुढील तपास त्यांच्याकडून सुरू झाला. परंतु, गुटख्याची ही खेप कोणाकडे जात होती, याचा मुख्य मालक कोण, ट्रांसपोर्ट कंपनी व इतर बाबींचा तपास लागलेला नाही.
निव्वळ चर्चेला ऊत; कारवाई केव्हा?
मूर्तिजापूर येथील अग्रवाल व अकोला जिल्ह्यामधील गुटखा व्यापारी कालू यांची चर्चा पोलीस वर्तुळात व गुटखा व्यापाºयांमध्ये रंगत होती. मात्र, एवढी रसद हाती असताना यापैकी वा इतर कुणावरही अन्न व औषध प्रशासनाने हात टाकला नाही. उलट, दर्यापूर पोलिसांनी आठ दिवस ट्रकचालक व क्लीनर यांना पोलीस कोठडीत ठेवून समजपत्रावर सोडले.
जेथे माल बनवण्यात आला, त्या मालकाचा शोध लागला आहे. गुटख्याचा माल कोणाकडे जात होता, याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याच्याकडून अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही.
- विश्वजित शिंदे, तपास अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग, अमरावती
सदर प्रकरणाचा तपास अन्न व औषध विभाग करीत आहे. आम्ही गुटखा पकडला, पण कारवाई करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत.
- मुकुंद ठाकरे, ठाणेदार, दर्यापूर