कोंडेश्वर परिसरात बिबट्याचा वावर
By admin | Published: November 28, 2015 01:03 AM2015-11-28T01:03:36+5:302015-11-28T01:03:36+5:30
कोंडेश्वरच्या आसपासचे जंगल आणि गोविंदपूर या अवघ्या ३०० लोकवस्तीच्या गावातील ग्रामस्थांना दोन महिन्यात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे.
गोविंदपूरवासी भयभीत : गावकरी सांगतात पट्टेदार वाघाचेही अस्तित्व
श्यामकांत सहस्त्रभोजने बडनेरा
कोंडेश्वरच्या आसपासचे जंगल आणि गोविंदपूर या अवघ्या ३०० लोकवस्तीच्या गावातील ग्रामस्थांना दोन महिन्यात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. मात्र, आपल्याला या भागात पट्टेदार वाघही दिसल्याचे गावकरी सांगतात. यामुळे गावकरी सद्यस्थितीत दहशतीच्या छायेत वावरत आहेत. हा पाणवठ्याच्या आणि जंगल परिसर असल्याने येथील ग्रामस्थांची दिनचर्याच प्रभावित झाली आहे.
श्रीक्षेत्र कोंडेश्वरपासून अगदी हाकेच्या अंतरावर गोविंदपूर गाव आहे. या गावालगत ‘बंदरजीरा’ हे वनक्षेत्र आहे. मागच्या दीड महिन्यांपासून गोविंदपूर गावालगतच्या जंगल परिसरात बिबट व पट्टेदार वाघाचा मुक्त संचार असल्याचे गावकरी सांगतात. अनेक गावकऱ्यांना बिबटच नव्हे तर पट्टेदार वाघही आढळल्याचे ते सांगतात. बिबटाने परिसरातील काही जनावरे फस्त केल्याचे भयभीत गावकरी सांगतात.
गोविंदपूर गावाला लागूनच डोंगराळ भाग आहे. गावासमोरुन जाणाऱ्या रस्त्यालगत बिबट अनेकदा आढळून आला. गोविंदपूर गावातील बहुतांश ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. रात्रीच्या वेळी अनेकदा बिबट किंवा पट्टेदार वाघांच्या डरकाळ्या ऐकल्याचे गोविंदपूरवासी छातीठोकपणे सांगतात.
पाण्यासाठी कोंडेश्वर तलावावर येतो बिबट
श्रीक्षेत्र कोंडेश्वर परिसरात गैबीपीर, भीवापूर, अलियाबाद असे तीन तलाव आहे. या तलावांच्या भोवताल जंगल परिसर आहे. रात्रीच्या वेळी या तलावांवर बिबट किंवा पट्टेदार वाघ पाणी पिण्यासाठी येतो. कोंडेश्वर परिसरात वाघाची डरकाळी अनेकांनी ऐकली आहे. दिवसा मात्र अद्याप या भागात बिबट आढळून आला नाही.