मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे ४६ व्या वर्षात पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 05:34 PM2019-02-21T17:34:52+5:302019-02-21T17:35:42+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. हा प्रकल्प २२ फेब्रुवारी रोजी ४६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पण, या ४५ वर्षांत वाघाला खायला पुरेशे खाद्य, तृणभक्षी प्राणी उपलब्ध करून देण्यात व्याघ्र प्रकल्प अपयशी ठरला आहे.
- अनिल कडू
परतवाडा (अमरावती) - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. हा प्रकल्प २२ फेब्रुवारी रोजी ४६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. पण, या ४५ वर्षांत वाघाला खायला पुरेशे खाद्य, तृणभक्षी प्राणी उपलब्ध करून देण्यात व्याघ्र प्रकल्प अपयशी ठरला आहे. तूर्तास मेळघाटात केवळ ४० वाघ आहेत. जंगलात खायला पुरेशे खाद्य नसल्यामुळे वाघांची संख्या रोडावत आहे. उंदीर, ससा, मुंगूस यासह जे हाती लागेल त्यावर त्याला आपली भूक क्षमवावी लागत आहे. कधी उपाशीपोटी, कधी अर्धपोटी राहत असलेला मेळघाटातील वाघ उंदीरही खात असल्याचा निष्कर्ष, अमरावती विद्यापीठांतर्गत प्राणिशास्त्र विभागातील संशोधकाने मांडला आहे.
सव्वाशे वाघांची क्षमता असलेला मेळघाट ४० वाघांवर स्थिरावला आहे. कधी ३९, तर कधी ५६ वाघ दाखविले जातात. रंगुबेली, हरिसाल, सेमाडोह, जारिदा, माखलासह सिपना व गुगामल वन्यजीव विभागातील जंगलाची पत घसरत अहे. मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये शिकाºयांचा ताण जंगलावर वाढला आहे. वाघांचा अधिवास सुरक्षित नसल्याने कोकटू किंवा कोअर भागातील दोन-चार अपवाद वगळता मेळघाटातील वाघीन केवळ एक ते दोन पिलं जन्माला घालते. ताडोबात मात्र हीच संख्या तीन ते चार असल्याच्या नोंदी आहे.
एन्डायरो रिझर्व्ह संघटनेने पाच वर्षाच्या अभ्यासाच्या आधारावर प्रकल्पातील तृणभक्षी प्राण्यांची प्रति चोरस किमी घनता स्पष्ट करताना सांबर २.७, गौर १, चौसिंगा ०.५, तर भेडकी ०.६ एवढी वर्तविली आहे. तृणभक्षी प्राण्यांची घनता मेळघाटात याहून कमी आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात येण्याआधी १९७२ मध्ये मेळघाट क्षेत्रात २१० वाघ होते. प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर ३२ वाघ नोंदविले गेले. १९७९ ला वाघांची संख्या ६३ वर गेली. १९८४ मध्ये ८० वाघ नोंदल्या गेलेत. मात्र पुढे १९८९ मध्ये ७७, १९९३ मध्ये ७२, १९९५ मध्ये ७१, १९९७ मध्ये ७३, २००७ मध्ये ५८ वाघ मेळघाट व्याघ्र प्रकल्पात नोंदले गेलेत. २०१४ मध्ये देशपातळीवरील व्याघ्र गणनेत केवळ ३२ वाघ नोंदल्या गेलेत. २०१६ मध्ये ४३ तर, २०१७ मध्ये ४१, तर २०१८ मध्ये ५६ वाघ मेळघाटात आहेत.
मेळघाटची जैवविविधता देशपातळीवर उल्लेखनिय ठरली असली तरी पर्यटक मात्र मेळघाटातील वाघांबाबत साशंक आहेत. केवळ पायांचे ठसे बघण्याचे सौभाग्य पर्यटकांना मिळते. देशातील ‘टॉप टेन’मध्ये आपले स्थान टिकवून ठेवणाºया मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हे वाघ केवळ कॅमेरा ट्रॅपपुरतेच मर्यादित आहेत. पर्यटकांना वन्यास्रवांसह व्याघ्र दर्शन घडावे म्हणून विकसित केल्या गेलेल्या पर्यटनक्षेत्रातही ते दिसेनासे झाले आहेत.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांतर्गत तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी आहे. वाघाला पुरेसे खाद्य मेळघाटात उपलब्ध नाही. मेळघाटातील वाघ उंदीर खातो. अमरावती विद्यापीठांतर्गत प्राणिशास्त्र विषयात पीएचडी करणाºया एका संशोधकाने हा निष्कर्ष २००८-०९ मध्येच आपल्या शोधप्रबंधात मांडला आहे.
ताडोबातील वाघीण तीन ते चार पिलं जन्माला घालते. मेळघाटात मात्र एक किंवा दोनच पिलं जन्माला येतात. मेळघाटातील वाघीण आपल्या पिल्लांच्या भविष्याविषयी, खाद्याविषयी, सुरक्षित अधिवासाविषयी साशंक आहे.
- जयंत वडतकर, मानद वन्यजीव रक्षक, अमरावती