अमरावती जिल्ह्यात चक्क न्यायाधीशांच्या टेबलवरून मोबाईल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:12 AM2018-01-06T11:12:58+5:302018-01-06T11:14:14+5:30
अंजनगाव सुजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. काळे यांचे स्टेनो कमलाकर अंबाडकर यांचा मोबाइल चोरी झाल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी पोलिसांनी चोरट्यास अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंजनगाव सुजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. काळे यांचे स्टेनो कमलाकर अंबाडकर यांचा मोबाइल चोरी झाल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी पोलिसांनी चोरट्यास अटक केली. न्यायालयाच्या टेबलवरून मोबाईल चोरी झाल्याची ही घटना २७ डिसेंबर रोजी घडली.
याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी प्रदीप ब्रम्हदेव इंगले (रा. अडगाव खाडे) याला अटक केली आहे. घटनेची फिर्याद दाखल होताच मोबाइलच्या आयएमईआय कोडच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता, न्यायालयात २७ डिसेंबरला पेशीवर आलेला प्रदीप इंगले याने अंबाडकर यांच्यासोबत संवाद साधताना मोबाईल चोरल्याची कबुली दिली. प्रभारी ठाणेदार जे.आर. शेख, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर, संदीप शिरसाठ, अमोल राऊत, निखिल विघे, योगेश बोदुले, श्रीकांत राठोड, किरण दहिवडे यांनी तपास पूर्ण केला.