मोर्शीत लवकरच मत्स्य विज्ञान महाविद्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 10:05 PM2018-04-07T22:05:29+5:302018-04-07T22:05:29+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्यानुसार येथे शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. याअनुषंगाने नुकतीच मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या चमुने बुधवारी, तर मुंबई येथील आयुक्तांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यामुळे विद्यार्थी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्यानुसार येथे शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. याअनुषंगाने नुकतीच मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या चमुने बुधवारी, तर मुंबई येथील आयुक्तांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यामुळे विद्यार्थी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या चमूने मोर्शी ते सिंभोरा मार्गावर असलेल्या राष्ट्रीय मत्स्यबीज केंद्रानजीक असलेल्या शासकीय जागेची पाहणी केली. यावेळी आ. बोंडे, नागपूर येथील शासकीय मस्यविज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता जाधव, छत्तीसगड येतील कामधेनू विद्यापीठाचे कुलगुरु वर्धे व मत्स्य विद्यापीठाचे भिंगारे, राऊत, गावंडे, सत्यजित बेलसरे व अमरावती येथील मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त श्याम गोटफोडे, प्रादेशिक उपायुक्त बालाजी पवार, संजय गारपवार, संदीप बाजड व धर्मे तसेच अजय आगरकर उपस्थित होते. शुक्रवारी मुंबई येथील आयुक्त नाईक यांनी जागेची पाहणी केली.
पुढील शिक्षणाची सुविधा
अमरावती विभागात शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय नसल्याने या शाखेत पुढील शिक्षणासाठी अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी नागपूर, मुंबई, रत्नागिरी गाठतात. परंतु, आता ही संधी मोर्शीमध्ये उपलब्ध होण्याच्या शक्यतेने विद्यार्थी वर्गामध्ये उत्साह वाढला आहे.
अनिल बोंडेंनी केली होती मागणी
वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथे शेकदरी तलावानजीक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २० मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन २४ डिसेंबर २०१७ रोजी झाले होते. त्यावेळी आ. अनिल बोंडे यांनी मोर्शी-वरूड भागात शासनाने मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला होकार दर्शविला होता.