पुणे येथे शेतकरी संघटनेची होणार राष्ट्रीय किसान परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 03:05 PM2017-12-06T15:05:36+5:302017-12-06T15:05:45+5:30
शेतकरी संघटनेच्यावतीने पुण्याच्या नवी पेठमध्ये राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन १० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. शरद जोशी व बाबू गेणू स्मृत्यर्थ आयोजित ही परिषद १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
अमरावती- शेतकरी संघटनेच्यावतीने पुण्याच्या नवी पेठमध्ये राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन १० डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. शरद जोशी व बाबू गेणू स्मृत्यर्थ आयोजित ही परिषद १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्यापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या चळवळीत ७० वर्षांत समस्या बिकट व जटील होत चालल्या आहेत. आंदोलनातून नेते तयार होतात. शेतकºयांच्या हाती मात्र काहीच लागत नाही. सत्ताधारी व विरोधी पक्षांबाबतही हाच अनुभव आल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा तिसरा पर्याय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय किसान परिषद होत आहे. यावेळी सुकाणू समितीचे सदस्य आणि देशभरातील शेतकरी नेते उपस्थित राहतील. शेतकऱ्यांच्या गळ्याला फास ठरणारे कायदे व धोरण बदलविण्याच्या दृष्टीने विधानसभेत आमदार व संसदेत खासदार निवडून देण्यासंबंधी देशव्यापी मोहिमेची चाचपणी यावेळी होईल, अशी माहिती सुकाणू समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व विदर्भ शेतकरी संघटनेचे संयोजक धनंजय काकडे यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रीय किसान परिषदेत १० डिसेंबरला रघुनाथदादा पाटील, चेगल रेड्डी (आंध्र प्रदेश), सतनामसिंग बेरू (पंजाब), दशरथ रेड्डी (आंध्र प्रदेश मार्गदर्शन करतील. ११ डिसेंबरला दोन सत्रांमध्ये रघुनाथदादा पाटील, श्रीगोपाल (तामिळनाडू), कालीदास आपेट, आ. बच्चू कडू, सतनामसिंग बेरू (पंजाब), समशेरसिंह दहिया (हरियाणा), बी.टी. अग्रवाल (राजस्थान), पार्थ शहा, हेरंब कुळकर्णी (दिल्ली), छावा संघटनेचे करण गायकर, मिलिंद मुरुगकर, शांताकुमार कुलबर्गी (कर्नाटक), बाळासाहेब पटारे (अहमदनगर), बाबा आढाव, कालीदास आपेट, दिनेश ओऊळकर (माजी सहकार आयुक्त) विविध विषयांवर मार्गदर्शन करतील. १२ डिसेंबरला शिवाजीनाना नांदखिले, योगेश दहिया (उत्तर प्रदेश), चंद्रशेखर (कर्नाटक), वीरेंद्रसिंह राय (बिहार), अनिल पाटील, तसनीम अहमद यांचे मार्गदर्शन होणार आहे.