आता आयटीआय परीक्षाही आॅनलाइन ?, लवकरच निर्णयाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 05:21 PM2017-11-02T17:21:43+5:302017-11-02T17:25:20+5:30
आॅनलाइन पद्धतीने परीक्षा आणि पेपर तपासणीमुळे प्रचंड गोंधळ उडत आहे. लाखो विद्यार्थी आणि पालक अक्षरश: हैराण होतात, असा पूर्वानुभव असतानाही शैक्षणिक क्षेत्रावर आॅनलाइनचे भूत कायम आहे.
अमरावती : आॅनलाइन पद्धतीने परीक्षा आणि पेपर तपासणीमुळे प्रचंड गोंधळ उडत आहे. लाखो विद्यार्थी आणि पालक अक्षरश: हैराण होतात, असा पूर्वानुभव असतानाही शैक्षणिक क्षेत्रावर आॅनलाइनचे भूत कायम आहे. आता आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यावरही ते लादले जाणार आहे.
आयटीआय परीक्षा आॅनलाइन घेण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आधीच संगणकाचा अभाव, त्यातही सतत लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. राज्यात ४०० हून अधिक आयटीआय संस्था आहेत. त्यात सुमारे १ लाख ३० हजार विद्यार्थी तंत्रशिक्षण घेतात. त्यांची सेमीस्टर पद्धतीने परीक्षा घेतली जाते. थिअरी आणि प्रॅक्टिकल असे परीक्षेचे स्वरूप असते. आता थिअरी परीक्षा आॅनलाइन घेण्यात यावी, असा प्रस्ताव राज्याच्या व्यवसाय शिक्षण व संचालनालयाला दिला आहे. परंतु या आॅनलाइन व्यापामुळे विद्यार्थ्यांना किती त्रास होईल याचा विचार झालेला नाही. ७० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागात परिस्थितीअभावी उच्च शिक्षण घेणे शक्य न झाल्याने बहुतांश विद्यार्थी आयटीआयचा पर्याय निवडतात. आयटीआयमध्ये शिकणारे ७० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. त्यांना संगणकाचे ज्ञान नसणे आणि संगणक असला तरी लोडशेडींगमुळे त्याचा अधिक वापर करता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षा देणे साहजिकच अवघड जाईल.
आॅनलाइन परीक्षा घेतल्यास प्रक्रिया वेगाने पार पडेल. त्याच हेतून तसा प्रस्ताव केंद्रीय व्यवसाय शिक्षण संचालनालय व शासनदराबारी विचाराधीन आहे. अद्याप तो मंजूर झालेला नाही.
- सचिन धुमाळ, प्राचार्य- व्यवसाय शिक्षण संस्था अमरावती
आयटीआय संस्थांमधील शिक्षकांची पदे भरा, २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, असे शासनाचे धोरण आहे. परंतु पदे भरली नसल्याने तिप्पट संख्येत विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. परिणामी विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष देणे शक्य नाही.
- भोजराज काळे, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना