नरभक्षक वाघिणीचे पगमार्क आढळले; लाईव्ह लोकेशन नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 04:53 PM2018-10-07T16:53:51+5:302018-10-07T16:55:39+5:30
वन्यजीव विभागाचे अधिकारी तळ ठोकून; मचानीवरून ‘टी-१’ चा दुर्बिणीने शोध सुरू
अमरावती : राळेगाव, पांढरकवडा परिसरातील जंगलात नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र अद्यापही त्यांनी यश आलेले नाही. आता वन विभागाला नरभक्षक वाघिणीचे पगमार्क आढळले असून, त्याआधारे मचानीवरून तिचा शोध घेतला जात आहे. वाघिणीचे लाईव्ह लोकेशन मिळत नसल्याने ‘टी-१’ मिशनवर तूर्तास प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राळेगाव तालुक्यातील सराटी जंगलात नरभक्षक वाघिणीने १३ जणांचा बळी घेतला. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी १२ सप्टेंबर २०१८ पासून वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी ए.के. मिश्रा, सुनील लिमये यांच्यासह प्रचंड मोठा फौजफाटा जंगलात तळ ठोकून आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने वन्यजीव विभागाने अनेक उपाययोजना केल्यात. परंतु, नरभक्षक वाघिणीचे लाईव्ह लोकेशन अद्यापही मिळाले नाही.
राळेगावच्या विस्तीर्ण जंगलात असलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात नरभक्षक वाघिणीचे पगमार्क कैद झाले आहे. या पगमार्कच्या आधारे वाघिणीचा पाठलाग केला जात आहे. जंगलात काही महत्त्वाच्या ठिकाणी मचानी निर्माण करण्यात आल्या असून, त्यावरुन वन कर्मचारी दुर्बिणीद्वारे वाघिणीचा शोध घेत आहेत. गत काही दिवसांपूर्वी ‘टी-१’ मिशन यशस्वीतेसाठी मध्यप्रदेशातून चार तर ताडोबा येथून एक असे पाच हत्ती जंगलात सोडण्यात आले होते. मात्र, ३ ऑक्टोबर रोजी ताडोबा येथील ‘गजराज’अचानक नियंत्रणाबाहेर झाला. त्याने चहांद व पोहणा येथे धुडगूस घातला. यात अर्चना कुळसंगे या महिलेचा बळी गेला. तर एक वृद्ध महिला जखमी झाली. याशिवाय गावातही मोठे नुकसान झाले. अखेर वन विभागाने नियंत्रणाबाहेर गेलेल्या हत्तीला राष्ट्रीय महामार्गावर जेरबंद केले. त्यानंतर हे पाचही हत्ती परत पाठविले आहे. यानंतर वाघिणीला जेरबंद करण्यासाठी सूर्योदय ते सूर्यास्त अशी मोहीम चालवण्यात आली. मात्र असे असताना वन्यजीव विभागाला कोणतेही यश मिळाले नाही. वाघिणीला जेरबंद करणे मोठे आव्हान असल्यामुळे पुन्हा हैद्राबाद येथून शूटर नवाबला बोलाविण्याचा हालचाली सुरू झाल्याची विश्वसनीय माहिती आहे.
२५ दिवसानंतरही ‘त्या’ वाघिणीचे दर्शन नाही
१३ जणांचे बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी राळेगाव, पांढरकवडा परिसरातील जंगलात वन्यजीव विभाग तळ ठोकून आहे. १२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या मोहिमेदरम्यान २५ दिवसांच्या कालावधीत तिचे ‘लाईव्ह लोकेशन’ मिळाले नाही. त्यामुळे आता मचानीचा आधार घेतला जात आहे. त्यासाठी जंगलात मचानीवरून अद्ययावत दुर्बिणीद्वारे नरभक्षक वाघिणीचा शोध घेतला जात आहे.
नरभक्षक वाघिणीला सुखरूप जेरबंद करायचे आहे. त्याकरिता वन्यजीव विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. जंगलात काही महत्त्वाच्या ठिकाणी मचानी तयार करण्यात आल्या असून, दुर्बिणद्वारे तिचा शोध घेतला जात आहे. अद्यापही लाइव्ह लोकेशन मिळाले नाही.
- सुनील लिमये,
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव विभाग.