मोकाट जनावरे मालकांकडून नऊ लाख रुपये दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 11:10 PM2018-04-01T23:10:03+5:302018-04-01T23:10:03+5:30
शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावणाऱ्या महापालिकेच्या पथकाने पशुपालकांकडून वर्षभरात ९ लाख ३१ हजार ९१५ रुपयांचा दंड वसूल केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक दंड वसुल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावणाऱ्या महापालिकेच्या पथकाने पशुपालकांकडून वर्षभरात ९ लाख ३१ हजार ९१५ रुपयांचा दंड वसूल केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक दंड वसुल करण्यात आला आहे.
पशुपालकांना जनावरांची योग्य ती काळजी घेणे आवश्यक असताना अनेक जण जनावरांना मोकाट चराईसाठी सोडून देतात. नियमांचे उल्लंघन करणाºया अशा पशुपालकांवर महापालिकेच्या पथकाकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. शहरात फिरणाºया मोकाट जनावरे वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा मोकाट जनावरांना पकडून गौरक्षणात ठेवण्यात येते. ज्यावेळी पशुपालक जनावरांना सोडविण्यासाठी येतात. त्यावेळी त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात येतो. महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातील स्वास्थ्य निरीक्षक पंकज कल्याणकर यांच्या पथकाने पोलीस विभागातील एएसआय सुनील धर्माळे, बुंदेले, नारायण सोळंके व गजभिये यांच्या मदतीने मोकाट जनावरांची धरपकड मोहीम राबविली. सन २०१५-१६ या कालावधीत २ लाख २२ हजार ५५६ दंड वसूल करण्यात आला. २०१६ -१७ मध्ये १,४९० मोकाट जनावरांना पकडून ५ लाख २६ हजार ९४४ रुपये व २०१७-१८ मध्ये १,३४२ जनावरे पकडून ९ लाख ३१ हजार ९१५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
१४ जणांविरुद्ध एफआयआर
मोकाट जनावरांना पकडताना अनेक पशुपालक महापालिका अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण करतात. अशावेळी पशुपालकांविरुद्ध पोलीस तक्रार केली जाते. वर्षभरात अशाच कारवाईदरम्यान तब्बल १४ पशुपालकांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार नोंदविण्यात आली आहे.
मोकाट जनावरांना पकडून पशुपालकांकडून दंड वसुली केली जाते. त्यादरम्यान पशुपालक वाद घालतात.त्यावर मात करत नऊ लाखांची दंडवसुली करण्यात आली.
पंकज कल्याणकर, स्वास्थ्य निरीक्षक, महापालिका.