परतवाड्यात ३० महिला घेणार अवयवदानाचा संकल्प, राज्यातील पहिलाच अभिनव प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 09:28 PM2018-04-10T21:28:02+5:302018-04-10T21:28:02+5:30
अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असले तरी त्यासाठी अजूनही नागरिक-नातेवाईक धजावत नाहीत. तथापि, परतवाड्यातील तब्बल ३० महिलांनी एकदिलाने अवयवदानाचा संकल्प केला आहे. परतवाडा येथे महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी त्या संकल्पपत्र भरून देतील.
- नरेंद्र जावरे
परतवाडा : अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असले तरी त्यासाठी अजूनही नागरिक-नातेवाईक धजावत नाहीत. तथापि, परतवाड्यातील तब्बल ३० महिलांनी एकदिलाने अवयवदानाचा संकल्प केला आहे. परतवाडा येथे महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून बुधवारी त्या संकल्पपत्र भरून देतील. राज्यात बहुधा पहिल्यांदा महिलांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात अवयवदान जागृती उपक्रम होत आहे.
परतवाडा शहरात पुनर्जीवन फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत २५ नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. बुधवारी महात्मा फुले जयंतीनिमित्त तब्बल ३० महिला संकल्प करणार आहेत. यामुळे परतवाडा शहरातील अवयवदात्यांची संख्या ५५ झाली आहे. मृत्यूनंतर आपल्या शरीरातील आवश्यक असे अवयव दुसºयाला दान देऊन त्याचे उर्वरित आयुष्य उज्ज्वल करण्याचे कार्य स्पृहणीय आहे. याबद्दल जनमानसात मोठ्या प्रमाणात जागृती व्हावी, यासाठी राज्यस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. त्याला अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे सर्वाधिक प्रमाणात यश मिळत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अमरावती येथे तीन रुग्णांचे उर्वरित आयुष्य अवयवदान करून उज्ज्वल करण्यात आले. त्यात एका किडनी प्रत्यारोपण केलेल्या रुग्णाचासुद्धा समावेश आहे.
महिला घेणार आज संकल्प
अवयवदान करण्याचा संकल्प आतापर्यंत मोठ्या प्रमाणात युवकांनी आणि पुरुषांनीच घेतला. परंतु, पहिल्यांदा 30 महिला अवयवदान करण्याचा हा अभिनव संकल्प बुधवारी करणार आहेत. इतर महिला, युवकांमध्ये त्या जनजागृती करणार आहेत.
पुनर्जीवन फाऊंडेशनच्या माध्यमातून बुधवारी ३० महिला अवयवदानाचा संकल्प करणार आहेत. यापूर्वी २५ जणांनी हा संकल्प केला आहे.
डॉ. राजेश उभाड, अध्यक्ष, पुनर्जीवन फाउंडेशन, परतवाडा