अचलपूर बसस्थानकच झाले भंगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:06 PM2018-03-06T23:06:59+5:302018-03-06T23:06:59+5:30

जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लौकिक असलेले अचलपूर शहरातील बसस्थानक भंगार अवस्थेला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालय असतानाही प्रवाशांसाठी नव्हे, तर बसस्थानक चोरटे, अवैध धंदेवाले, प्रेमीयुगुल, दारूड्यांसाठी कमालीचे उपयोगी ठरत आहे.

Scratches at Achalpur Bus Station | अचलपूर बसस्थानकच झाले भंगार

अचलपूर बसस्थानकच झाले भंगार

Next
ठळक मुद्देएसटी महामंडळाचे दुर्लक्ष : नागरिकांनी फोडली टिनपत्रे, अवैध धंद्यासाठी जागेचा वापर

आॅनलाईन लोकमत
अचलपूर : जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लौकिक असलेले अचलपूर शहरातील बसस्थानक भंगार अवस्थेला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालय असतानाही प्रवाशांसाठी नव्हे, तर बसस्थानक चोरटे, अवैध धंदेवाले, प्रेमीयुगुल, दारूड्यांसाठी कमालीचे उपयोगी ठरत आहे.
जवळपास एक लाख लोकवस्ती व ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या अचलपूर येथील बसस्थानकात एसटी बसचे दुर्मीळ दर्शन झाले असले तरी गाढव, म्हशी, वराह मोठ्या प्रमाणात येतात. मोकाट जनावरांचा येथे नेहमीच येथे ठिय्या असतो. उघड्यावर शौचासाठीही परिसरातील नागरिक याचा वापर करतात. अनेकांच्या म्हशी बांधलेल्या असतात. शिल्लक भागात लहान मुले क्रिकेटचा आनंद घेतात, तर रात्रीला दारू व जुगाराचा अड्डा या ठिकाणी चालतो. म्हशीचे शेणखताचे ढिगारे या ठिकाणी तयार झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अकारण डासांचा, दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
अचलपूर मतदारसंघाला दोन राज्यमंत्रिपदे लाभली तरी बसस्थानकाकडे कोणीही लक्ष दिले नाही. संपूर्ण राज्यात आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाकरिता प्रसिद्ध असलेले व १५ वर्षांपासून अचलपूर विधानसभेचे आमदार प्रहारचे बच्चू कडू यांनी अनेक वेळा बसस्थानक सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. रक्तदान शिबिरे घेतली, आंदोलने केले; परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या जाचक अटींमुळे बसस्थानक सावरू शकले नाही.
जुळ्या शहरांपैकी अचलपूरची मरगळ झटकण्यासाठी हे बसस्थानक पुन्हा भरभराटीस येणे अत्यावश्यक आहे. येथे एसटी बस येणे महत्त्वपूर्ण आहे. मात्र त्यासाठी पुढाकार घेण्यास कोणीही इच्छुक नाही. बाहेरील प्रवासी अचलपुरात येत नसल्यामुळे भांडवल खेळते व्हायला संधी नाही. त्यामुळे अचलपूरचा विकास खुंटला आहे.

तत्कालीन राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विनायकराव कोरडे यांनी ३४ लाख रुपये खर्चून शहराबाहेर बसस्थानक बांधले होते. जुन्या अचलपूरचा विकास होईल, अशी भूमिका त्यामागे होती. काही वर्षे या बसस्थानकाने नागरिकांना सेवा दिली. मात्र, आठ वर्षांपासून या बसस्थानकात हळूहळू एसटी बस येणे बंद झाले. दरम्यान कर्मचारी येथून निघून गेले, तर नळ, पंखे, ट्यूबलाइट, लोखंडी ग्रिल, दरवाजे, टाइल्स, विद्युत वायर चोरट्यांनी काढून नेल्या. या बेवारस वास्तूची देखभाल नसल्यामुळे फरशी, विटासुद्धा चोरट्यांनी काढून नेल्या.

या बसस्थानकाच्या जागेवर आदिवासी विद्यार्थी प्रशिक्षण केंद्र बनावे, याकरिता शासनाला प्रस्ताव पाठविला होता. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे तो रद्द झाला.
- बच्चू कडू, आमदार,
अचलपूर मतदारसंघ

Web Title: Scratches at Achalpur Bus Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.