वरिष्ठ वनाधिकारी परिषदेला थाटात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 09:53 PM2017-09-15T21:53:05+5:302017-09-15T21:53:22+5:30
वाघ हे पराक्रमाचे प्रतिक आहे. मेळघाटच्या रुपाने हा जिवंत पराक्रम जिल्ह्याच्या इतिहासाची साक्ष देत सोबत आहे.
अमरावती : वाघ हे पराक्रमाचे प्रतिक आहे. मेळघाटच्या रुपाने हा जिवंत पराक्रम जिल्ह्याच्या इतिहासाची साक्ष देत सोबत आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे ९ वी वरिष्ठ वन अधिकाºयांची परिषद आयोजित करण्याचे भाग्य लाभले. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचे प्रादेशिक वन विभागाचे सर्व वरिष्ठ वनाधिकारी शहरात दाखल झाले आहे.
वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) श्री. भगवान यांनी वृक्ष पूजन करून शुक्रवारी परिषदेचे उद्घाटन केले. सदर परिषदेत वन विभागाच्या मुख्य कामांचा व वनीकरणाच्या योजनेचे सादरीकरण व आढावा झाला. २०१८ च्या पावसाळ्यात करावयाच्या १३ कोटी वृक्ष लागवडी बाबत प्रत्येक प्रादेशिक वन वृत्ताने त्यांचे नियोजन व आढावा सादर केले. नवनवीन संकल्पना या परिषदेच्या निमित्ताने मांडल्या व चर्चिल्या गेल्या. परिषदेत कमी खर्चात वन्य प्राण्यांपासून शेती पिक वाचविण्याचे सोलर फेन्सिंग मॉडेल प्रदर्शित करण्यात आले. तसेच पायी गस्त करणाºया वनरक्षकास जर संकटाच्या वेळी निर्भिड जंगलातून स्वत:चे तंतोतंत स्थान सांगता यावे, म्हणून जी.पी.एस.स्टिकचे संशोधन करण्यात आले असून त्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. याशिवाय वन कर्मचाºयांच्या गस्ती वर देखरेख ठेवता यावी व गस्तीचे नियोजन करता यावे, म्हणून नव्याने सुरु करण्यात आलेल्या एम-स्ट्राईप चे प्रदर्शन सुद्धा ठेवण्यात आले आहे. वन विभागाचे वाहनांना जिओटॅगिंग करून त्यांचे वर देखरेख ठेवण्याची नवीन तंत्रप्रणाली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने विकसित करून लागू केली आहे, त्याचे प्रात्यक्षिक प्रदर्शन येथे करण्यात आले आहे.
वन्य प्राण्याची शास्त्रीय माहिती देणारे ‘डू यु नो?’चे, मेळघाटात असणाºया पर्यटकांना स्थळांची माहिती देणारे विविध फलक प्रदर्शित करण्यात आले आहे. आय.यु.सी.एन. मार्फत देण्यात आलेल्या बस ला मोठ्या थाटामाटात मेळघाट व वन्य प्राण्यांच्या रंगात रंगविण्यात आले. मेळघाटचा अभिमान असलेल्या फॉरेस्ट ओवलेट या अतिदुर्मिळ घुबडाच्या प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहे. सदर प्रतिकृती मध्ये एक बेल (घंटा) ठेवण्यात आली असून जी दाबली असता फोरेस्ट ओवलेट चा हुबेहूब आवाज येतो. सदर प्रतिकृती सचिव वने विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांचे हस्ते अनावरण १६ सप्टेंबरला करण्यात येईल. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातर्फे आदिवासीच्या रोजगाराकरिता एक अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. आठवी उत्तीर्ण असलेल्या प्रौढ युवाना ३ महिन्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्यांना आदरतिथ्याचे प्रशिक्षण देऊन तारांकित हॉटेल मध्ये चांगल्या पगाराची नोकरी दिली जाते. आतापर्यंत मेळघाटमधून ५०० पेक्षा जास्त आदिवासी तरुणांनी अशा प्रकारे प्रशिक्षण घेऊन नोकरीला लागले आहे. अशाच प्रशिक्षण घेणाºया २० युवकांची तुकडी ९ वी वन परिषदेचे आदरतिथ्य करीत आहे. ही एक मेळघाट व वन विभागासाठी गौरवाची बाब आहे. दोन दिवसांच्या परिषदेचे नियोजन मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांनी केले. या परिषदेची सांगता उद्या १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात येईल.