जलयुक्तच्या गाळाने शिवार समृद्ध, ३,९६० कामांतून १७० लाख घनमीटर काढला गाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 04:48 PM2017-12-13T16:48:05+5:302017-12-13T16:49:04+5:30
अमरावती : टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून विभागातील १५१९ गावांतील कामांमधून १७०.१५ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला.
- गजानन मोहोड
अमरावती : टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून विभागातील १५१९ गावांतील कामांमधून १७०.१५ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला. शेतक-यांना विनारॉयल्टी गाळ मिळाल्याने हजारो हेक्टर शेतजमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. यामुळे शिवार समृद्ध झाले आहे.
दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्य शासनाचे जलसंपदा, कृषी, लघुसिंचन, जिल्हा परिषद यांसह अन्य विभागांच्या वतीने १५१९ नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले. यापैकी ८४४ शासकीय व ३९० कामे लोकसहभागातून करण्यात आली. या सर्व कामांमधून साधारणपणे १७०.१५ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. हा गाळ शेतक-यांना विनारॉयल्टी केवळ वाहतूक खर्च सहन करून नेण्याची मुभा आहे. शेकडो वर्षांपासून नदी-नाल्यांत जमा झालेला गाळ सुपीक असल्याने विभागातील हजारो हेक्टर शेती समृद्ध होत आहे. जमिनीचा पोत सुधारण्यास या गाळामुळे मदत होत असल्याचे शेतक-यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांमध्ये शासकीय कामांमधून ६४.२२ व लोकसहभागातून झालेल्या कामांमधून १०५.९७ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला आहे. हा गाळ काढल्यामुळे शासकीय ५८०.१६ किमी व लोकसहभागातील १४३.४० किमी लांबीची कामे झाली आहेत. अशी एकूण ७२३.५६ किमी लांबीची कामे झालीत. याचा दुहेरी लाभ शेतक-यांना झाला. या सर्व कामांवर १५८.६९ कोटींचा निधी खर्च झालेला आहे. या कामांमुळे संबंधित गावांमधील जलस्तर वाढल्यासोबतच शेतीसाठी गाळ उपलब्ध झाल्यामुळे शिवाराची सुपीकता वाढून शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे.
जिल्हानिहाय काढलेला गाळ
जलयुक्तच्या ३,९६० कामांमधून १०५.९७ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३८.२१, अकोला ४७, यवतमाळ १०.७७, बुलडाणा ४२.१५ व वाशीम जिल्ह्यात १२.७२ लाख घनमीटर गाळ उपलब्ध झाला.
३९६० कामांवर १५८ कोटींचा खर्च
अमरावती विभागातील १५१९ गावांमधील ३,९६० कामांवर गेल्या दोन वर्षांत १५८ कोटी ६९ लाखांचा खर्च करण्यात आला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४६.४५ कोटी, अकोला ३५.८, यवतमाळ १२.५४, बुलडाणा ४४.३२ व वाशिम जिल्ह्यात १४.५७ कोटींचा निधी खर्च झाला. विभागात सद्यस्थितीत ८१२ कामे प्रगतीत आहेत.