जागतिक शांतीसाठी संतसाहित्य नवसंजीवनी
By admin | Published: January 12, 2016 12:12 AM2016-01-12T00:12:42+5:302016-01-12T00:12:42+5:30
असहिष्णुतावाद आणि जागतिक दहशतवादावर संत साहित्य जालीम औषध ठरणार आहे.
संमेलनाचे सूप वाजले : पुढील आयोजन इंदूरमध्ये
अमरावती : असहिष्णुतावाद आणि जागतिक दहशतवादावर संत साहित्य जालीम औषध ठरणार आहे. देशातील विविध संतांनी जगाला प्रेरक ठरेल, अशी साहित्य निर्मिती केल्याने ते संतसाहित्य जागतिक शांतीसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचा सूर येथील सर्व संत साहित्य संमेलनातून निघाला.
व्यापक प्रतिसाद लाभलेले पहिले अखिल भारतीय सर्व संत साहित्य संमेलनाचे आज सोमवारी सूप वाजले. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात ९ जानेवारीला संत साहित्य संमेलनाची सुरूवात झाली होती. देशाच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासकांनी संत साहित्याची गरज प्रतिपादीत केली.
२०१६ चे संत साहित्य
संमेलन इंदूर येथे
पहिल्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाचा सोमवारी तिसऱ्या दिवशी समारोप झाला. दुसरे संत साहित्य संमेलन जानेवारी २०१७ मध्ये इंदूरमध्ये होणार असल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. त्या आयोजनाची जबाबदारी बाबा महाराज तरोळकर, लिला मोरे (इंदूर), मुकुंद डोळे, सुभाष जाऊरकर, बबन मांडवकर यांच्याकडे असल्याची माहिती संमेलनात देण्यात आली. तत्पूर्वी आज सकाळी ‘संत साहित्य दर्शन’ या विषयावर परिसंवाद झाला. यात संत कबीर, महावीर, संत रविदास, सुफी संत, बाबा फरिदी, श्री बसवेश्वर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत नरसी मेहता आणि संत तुलसी यांचा जीवनप्रवास आणि साहित्यावर संजय धोटे, म्हैसुरचे सुयोग निधीजी, इंदूरच्या लीला मोरे, जुल्फी शेख, सुनंदा जामकर, रमेश खंडारे, श्रीकांत गोंधळेकर, ज्योती मंत्री सहभागी झाले. या मान्यवरांनी देशातील संत साहित्यातील बारकावे आणि त्यातील जीवनमूल्यांचे विवेचन केले.
परिसंवादांना व्यापक प्रतिसाद
अमरावती : दुपारी १ च्या सुमारास अ. भा. महानुभाव साहित्य महामंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम नागपुरे, देवळीचे सामाजिक कार्यकर्ते मोहन अग्रवाल आणि माजी प्राचार्य रमेश हुकूम यांचा सत्कार करण्यात आला. तर येथील अनुभूती पाटील यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण करण्यात आले. सायंकाळी ६ च्या सुमारास संत कान्होपात्रा हे नाटक सादर करण्यात आले.
९ आणि १० जानेवारीला झालेल्या संत साहित्य संदर्भात वर्तमान जीवनात संत साहित्याचे औचित्य आणि संत साहित्यातून उलगडणारे स्त्रीमनाचे भावविख या तीनही परिसंवादाला व्यापक प्रेक्षकवर्ग लाभला. ९ जानेवारीला ग्रंथदिंडीने सुरू झालेल्या या तीन दिवसीय सर्व संत साहित्य संमेलनाचे सोमवारी नाटक सादर करुन सूप वाजले.