सुजय विखेंना भाजपात घेतले, शरद पवारांना घेऊ नका - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 04:56 PM2019-03-15T16:56:16+5:302019-03-15T17:39:56+5:30
जेमतेम दोन दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, आता शरद पवार यांना भाजपात घेऊ नका, असा सल्ला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी येथे दिला.
अमरावती : राज्यात भाजप-शिवसेनेत युती झाली. आता दरदिवशी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमधून युतीत प्रवेश करणाऱ्यांची रांग लागत आहे. जेमतेम दोन दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, आता शरद पवार यांना भाजपात घेऊ नका, असा सल्ला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी येथे दिला.
युती झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे मेळाव्याच्या निमित्ताने अमरावतीत एकत्र आले. उद्धव ठाकरे यांनी युुती करण्यामागील भूमिका मांडली. देश, राज्यात हिंदुत्वाच्या विचारसरणीचे सरकार असावे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. गत पाच वर्षांत काही मुद्द्यांवर शिवसेनेचे भाजपसोबत मतभेद होते. तथापि, हे मतभेद गरीब, सामान्य, कष्टकरी, शेतकऱ्यांच्या हितासाठी होते. गरिबांच्या आशेवर पाणी पडू नये, यासाठी काही प्रकल्प, विषयांना कडाडून विरोध केला. युती होण्यापूर्वी या सर्व बाबी स्पष्ट केल्यात; त्यानंतरच युतीला होकार दिला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. युतीला २५ वर्षांचा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांचा त्यामागे संघर्ष आहे. त्यामुळेच कार्यकर्त्या समोर प्रचाराचे नारळ फोडले, असे त्यांनी जाहीर केले.
आतापर्यंत भाजपवर टीका केली. यापुढे कोणावर करायची, हा प्रश्न आहे. कारण काँग्रेस, राष्ट्रवादी रिकामे होत आहेत. भाजपने सुजय विखेंना प्रवेश दिला, आता शरद पवार यांना देऊ नका. कारण आपल्याला टीका करण्यासाठी विरोधक लागेल, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. विभागीय युती मेळाव्याला राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, राज्यमंत्री संजय राठोड, श्रीकांत देशपांडे, पालकमंत्री प्रवीण पोटे, दीपक सावंत आदी उपस्थित होते.