राजकीय अस्तित्व संपवून टाकू; धामणगाव रेल्वेच्या आमदारांना तहसीलदारांनी दिली धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 11:25 AM2022-06-06T11:25:59+5:302022-06-06T13:16:09+5:30

MLA Pratap Adsad : तहसीलदार यांनी एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून सूतगिरणीची जागा शासनदरबारी जमा करण्याची आणि राजकीय अस्तित्व संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रताप अडसड यांनी केला आहे.

Tehsildar threatens Dhamangaon Railway MLA Pradip Adsad | राजकीय अस्तित्व संपवून टाकू; धामणगाव रेल्वेच्या आमदारांना तहसीलदारांनी दिली धमकी

राजकीय अस्तित्व संपवून टाकू; धामणगाव रेल्वेच्या आमदारांना तहसीलदारांनी दिली धमकी

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार प्रताप अडसड यांचा पत्रपरिषदेत आरोप

अमरावती : धामणगाव रेल्वेचे तहसीलदार यांनी राजकीय अस्तित्व संपवण्याचा आणि सूतगिरणीची जागा शासनदरबारी जमा करण्याची धमकी दिली, असा आरोप आमदार प्रताप अडसड (Pratap Adsad) यांनी रविवारी पत्रकार परिषदेतून केला.

धामणगाव तालुक्यात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी सुरू आहे. या रेती तस्करांना एसडीओ आणि तहसीलदारांचे पाठबळ असून, याची जिल्हा प्रशासनाने योग्य चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही, अशी टीका अडसड यांनी केली.

गोकुळसरा येथील रेती घाटावर बोटींद्वारे रेतीचे उत्खनन सुरू असताना रेती घाटावर अडसड यांनी पोलिसांच्या मदतीने धाड टाकून चार बोटी तसेच ट्रक जप्त केले. ही कारवाई करताना चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी तसेच धामणगावचे तहसीलदार प्रदीप शेलार यांना संपर्क करूनही ते घटनास्थळी आले नाहीत, असा आरोपही अडसड यांनी केला आहे.

त्यामुळे तस्करांना या दोन्ही अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचे प्रताप अडसड यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी चौकशी करून उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनाही निलंबित करण्याची मागणी प्रताप अडसड यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात तहसीलदार यांनी एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून सूतगिरणीची जागा शासनदरबारी जमा करण्याची आणि राजकीय अस्तित्व संपविण्याची धमकी दिल्याचा आरोप प्रताप अडसड यांनी केला आहे.

यापूर्वी माजी आमदारांकडून अशा प्रकारच्या धमक्या मिळत होत्या. परंतु तहसीलदाराकडून अशा प्रकारची धमकी मिळणे हा प्रकार गंभीर असून याला राजकीय पाठबळ असल्याचेही अडसड यांचे म्हणणे आहे. येत्या पाच दिवसात दोन्ही अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली नाही तर आंदोलन करू, असा इशारा आमदार प्रताप अडसड यांनी दिला. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविराज देशमुख उपस्थित होते.

माझ्यावर झालेल्या आरोपाचे खंडन करतो. दोन दिवसांपूर्वी रेती माफियाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली. त्याच माफइयाविरुद्घ दहा वर्शांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली होती. कारवाई करताना भेदभावाचा प्रश्नच उद्भवत नाही. तीन दिवसात दोन अन्य गाड्यादेखील जप्त केल्या आहेत.

- प्रदीप शेलार, तहसीलदार, धामणगाव रेल्वे

Web Title: Tehsildar threatens Dhamangaon Railway MLA Pradip Adsad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.