स्कूलबस बैठकीला शिक्षणाधिकाऱ्यांची पाठ
By admin | Published: December 31, 2015 12:15 AM2015-12-31T00:15:21+5:302015-12-31T00:15:21+5:30
पोलीस आयुक्त कार्यालयात बुधवारी झालेल्या स्कूल बस समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे जिल्हा परिषदेच्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली.
अंमलबजावणीवरुन प्रश्नचिन्ह : अन्य अधिकाऱ्यांची उपस्थिती
अमरावती : पोलीस आयुक्त कार्यालयात बुधवारी झालेल्या स्कूल बस समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे जिल्हा परिषदेच्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली. ज्या यंत्रणेकडे अंमलबजावणीची जबाबदारी आहे. त्या यंत्रणेचे प्रमुखच बैठकीला अनुपस्थित असेल तर तशा सूचना द्यायच्या कुणाला, असा प्रश्न बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
पोलीस, महापालिका आयुक्त आणि आरटीओ सहशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक बुधवारी पोलीस आयुक्त कार्यालयात घेण्यात आली.
स्कूल बस नियमावलीची सर्वत्र अंमलबजावणी करण्यासाठी शाळा, शहर, जिल्हा पातळीवर परिवहन आणि स्कूल बस सुरक्षितता समिती नेमली आहे. महापालिकेच्या हद्दीत पोलीस आयुक्त आणि ग्रामीण भागातील शाळांसाठी पोलीस अधीक्षक या समितीचे अध्यक्ष आहेत.
विद्यार्थी सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा आढावा घेणे आणि त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी या समितीवर आहे. त्यासाठी दर सहा महिन्यांनी बैठक घेण्याचा आदेश आहे. त्यानुसार २० जूनला बैठक पार पडली. दुसरी वार्षिक बैठक आज घेण्यात आली. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हीताचा मुद्या असतांना शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. (प्रतिनिधी)