नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला; पक्षाचा राजीनामा देताना डोळ्यात पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 05:25 PM2024-03-28T17:25:14+5:302024-03-28T18:02:27+5:30

अमरावतील लोकसभा मतदारसंघातून भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली.

The dam of tears of Navneet Rana broke; Tears in the eyes while resigning from the party of husband | नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला; पक्षाचा राजीनामा देताना डोळ्यात पाणी

नवनीत राणांच्या अश्रूंचा बांध फुटला; पक्षाचा राजीनामा देताना डोळ्यात पाणी

मुंबई/अमरावती - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना भाजपाने लोकसभेचं तिकीट जाहीर केल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाचे कमळ हाती घेत, अब की बार, ४०० पार चा नारा दिला. तत्पूर्वी नवनीत राणा यांनी राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टीच्या सदस्यपदाचा आणि महिला कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षाचे संस्थापक आमदार रवि राणा आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी आपले राजीनामा पत्र दिले. त्यावेळी, त्यांना अश्रू अनावर झाले होते. राष्ट्रीय युवा स्वाभीमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नारेबाजी देत, त्यांना शुभेच्छा देत त्यांचा राजीनामा स्वीकारला. 

अमरावतील लोकसभा मतदारसंघातून भाजपाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध असून आमदार बच्चू कडू यांनीही स्पष्ट शब्दात विरोध दर्शवला आहे. तसेच, नवनीत राणांना पाडण्यासाठी काम करणार असल्याचं कडून यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. दरम्यान, मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद विसरुन मला समर्थन करावं, असे नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, लोकसभेचं तिकीट जाहीर झाल्यानंतरच त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि युवा राष्ट्रीय स्वाभीमान पक्षाच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षपदाचा राजीनामाही दिला. त्यावेळी, भावनिक होऊन त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

''स्वत:च्या पक्षात काम करणं आणि त्यानंतर देशासाठी आवश्यक आहे, म्हणून नवीन इनिंग सुरू करणं, याच भावनेतून मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. गेल्या १२ ते १३ वर्षांपासून ज्या पक्षात काम केलं, आपल्या परिवारातील लोकांसोबत काम केलं. त्यामुळे, साहजिक आहे, आज डोळ्यात पाणी आहे. पण, हे आनंदाश्रू म्हणता येईल,'' अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी पक्षाचा राजीनामा देताना व्यक्त केली.  

अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून नवनीत राणा २०१९ मध्ये खासदार बनल्या होत्या. भाजपा-शिवसेना युती असताना, मोदींच्या लाटेतही नवनीत राणांनी शिवसेना उमेदवाराचा पराभव करत अमरावतीची निवडणूक जिंकली. मात्र, यंदा राज्यातील राजकीय समिकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. नवनीत राणांच्या भूमिकेकडे व अमरावतीच्या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात, आज भाजपाने अधिकृतपणे त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे, त्यांनी भाजपाचे सदस्यपद स्वीकाराले. त्यामुळे, लवकरच त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टीच्या सदस्यपदाचा आणि महिला कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे नवनीत राणा यांनी त्यांचे पती आमदार रवि राणा यांच्याच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. 

''मी श्रीमती नवनीत रवि राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्यकारी अध्यक्ष पदावर कार्यरत होते, आज 27 मार्च 2024 रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्यकारी अध्यक्ष आणि प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे. आजपर्यंत पक्षाने मला जो सम्मान दिला, आणि मदत केली, त्यासाठी मी संपुर्ण युवा स्वाभिमान पार्टीला धन्यवाद देते,'' असा आशय नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रवि राणा यांना लिहिलेल्या पत्रात आहे. तसेच, कृपया आपण माझा राजीनामा स्वीकार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

राणांच्या उमेदवारीला मोठा विरोध

आमदार बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांच्यामुळे नवनीत राणांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ हे नवनीत राणा यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उभे राहण्याच्या तयारीत आहेत. तसेच, बच्चू कडू यांनीही, सर्वच मोठ्या नेत्यांनी एकत्रित होऊन या निवडणुकीकडे बघायला हवे. आपल्या पेक्षाही ज्याला पाडायचे आहे, ते टार्गेट लक्षात घेऊन समोर जायला हवे. कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार निवडून येतो हे महत्वाचे नाही, तर नवनीत राणा यांना पाडणे महत्वाचे आहे, असे म्हटले आहे.
 

Web Title: The dam of tears of Navneet Rana broke; Tears in the eyes while resigning from the party of husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.