गोळीबारप्रकरणी आणखी तिघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:06 AM2017-12-26T01:06:00+5:302017-12-26T01:06:15+5:30
अलहिलाल कॉलनीत झालेल्या गोळीबार प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना सोमवारी पहाटे अटक केली. शेख इस्माईल शेख उस्मान (५३), शेख इरफान शेख इस्माईल (२०) व राजू ऊर्फ शेख रिहान शेख इस्माईल (२२ सर्व रा. हबीबनगर) अशी आरोपींची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अलहिलाल कॉलनीत झालेल्या गोळीबार प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी आणखी तीन आरोपींना सोमवारी पहाटे अटक केली. शेख इस्माईल शेख उस्मान (५३), शेख इरफान शेख इस्माईल (२०) व राजू ऊर्फ शेख रिहान शेख इस्माईल (२२ सर्व रा. हबीबनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एक देशी कट्टा जप्त केला.
जुन्या वैमनस्यातून दोन गटांत उफाळून आलेल्या वादानंतर शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये अन्सार शाह जमील शाह (२८, रा. अलहिलाल कॉलनी) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर राजीक ऊर्फ राजा शाह युसूफ शाह (३५), शाकीर शाह बसीर शाह (३२) आणि नौशाद शाह मुस्ताक शाह (२८, सर्व रा. हबीबनगर) जखमी झाले. याप्रकरणात पोलिसांनी रविवारी दुपारी मुख्य आरोपी शेख मन्नान, त्याचा मुलगा शेख सलमान व शेख हन्नान या तिघांना अटक केली.
याप्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली होती. त्यापैकी गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पवार यांच्या पथकाने तीन आरोपींना आष्टीवरून अटक केली. शेख इस्माईलच्या आष्टीतील सासरच्या घरी आरोपींनी आश्रय घेतला होता. आता या प्रकरणातील अन्य एका पसार आरोपीचा शोध पोलीस घेत आहे.
पोलिसांनी सहा आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करून दहा दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जुन्या वैमनस्यात समझोता करण्यासाठी गेलेलो असताना अचावक गोळीबार झाल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
संपत्तीची चौकशी करा
गोळीबार प्रकरणातील आरोपी शेख मन्नान हा गुन्हेगार आहे. त्याचा ट्रकचोरीचा व्यवसाय आहे. तो पूर्वी कटला चालवित होता. आता त्याने मोठी संपत्ती गोळा केली आहे. त्याच्या संपत्तीची तसेच ती मिळविताना वापरलेल्या मार्गांची चौकशी व्हावी, अशी मागणी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेतून मृत व जखमींच्या समर्थकांनी केली आहे. यावेळी नगरसेविका हफीजाबी यांचा मुलगा फिरोज शाह युसूफ शाह, शेख नईम शेख करीम, अब्दुल शारीक अब्दुल मजिद, शेख आबीद, मोहम्मद जिया व मो. अकबर उपस्थित होते. शनिवारी रात्री अन्सारचे समर्थक मन्नानच्या घरी गेले होते. त्यांनी अचानक हल्ला चढविला. आम्ही निशस्त्र गेले होतो, असा खुलासा अन्सार समर्थकांनी केला.